आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियाचा झालेला पराभव हा भारतीय चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. कोणी अपेक्षा केली नव्हती असं घडलं. टीम इंडिया आयर्लंडमध्ये पोहोचली, तेव्हा सर्वांनाच असं वाटलं की, आपण सहज जिंकू. पण टीम इंडियाचं हे प्रदर्शन वर्ल्ड चॅम्पियन्सना अजिबात साजेस नाही. खाडकन डोळे उघडणारी ही कामगिरी आहे. ही मालिका सुरु होण्याआधी आयर्लंडकडे एक दुबळ संघ म्हणून पाहिलं जात होतं. पण त्यांनी हा समज चुकीचा ठरवला. मायदेशातील कंडीशन्सचा पुरेपूर फायदा उचलत आयर्लंडने बलाढ्य टीम इंडियाला लोळवलं. या पराभवाचं आता विश्लेषण सुरु झालय. मालिका गमावण्याचं खापर हेड कोच गौतम गंभीर यांच्या माथ्यावर फोडण्यात आलं आहे. त्यांच्या रणनितीला जबाबदार धरलं जात आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर यांनी गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या संतुलनावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. फेवरेट म्हणून टीम इंडिया आयर्लंडमध्ये दाखल झाली होती. पण पहिल्या सामन्यात 34 धावांनी व दुसऱ्या सामन्यात एक रन्सने पराभव झाला. दुसऱ्या सामन्यातही टीम इंडिया आयर्लंडच्या तुलनेत सरस वाटत नव्हती. ऑलराऊंडरच्या शोधात टीम इंडियात जास्तच सुधारणा केलीय असं संजय मांजरेकर यांचं मत आहे. “आधी खूप कमी होते, पण आता गंभीर यांच्या कार्यकाळात ऑल राऊंडर खूप झाले. भारताला शुद्ध मधल्या फळीत खेळणाऱ्या फलंदाजांची गरज आहे” अशी संजय माजंरेकर यांनी पोस्ट केली.
दोघे बाद होताच सामना भारताच्या हातातून निसटला
आयर्लंड विरुद्ध दोन्ही सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. पहिल्या सामन्यात विजयासाठी 183 धावांचं आव्हान होतं. भारताचा डाव दोन ओव्हर शिल्लक असतानाच 148 धावांवर आटोपला. अभिषेक शर्माने 20 चेंडूत 49 धावांची खेळी करुन टीम इंडियाला दमदार सुरुवात करुन दिली होती. पण मधल्या फळीतील फलंदाज टीमला विजयापर्यंत घेऊन जाण्यात कमी पडले.
श्रेयस अय्यर, इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल हे खेळपट्टीवर थांबून मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. दुसऱ्या सामन्यात तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी मधल्याफळीत भागीदारी केली. त्यामुळे विजयाची आशा निर्माण झालेली. तिलक वर्माने 46 चेंडूत 55 धावा केल्या. पण हे दोघे बाद होताच सामना भारताच्या हातातून निसटला.