Last Updated:
केतनचा काटा काढण्यासाठी आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केवळ पुण्यातच नव्हे, तर थेट राजस्थानात जाऊन हत्येची ‘रिहर्सल’ केल्याचं तपासात समोर आलं आहे
पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज खळबळजनक आणि थ्रिलर चित्रपटालाही मागे टाकतील, असे खुलासे होत आहेत. आता याच प्रकरणात सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांचं आणखी एक धक्कादायक कृत्य समोर आलं आहे. केतनचा काटा काढण्यासाठी आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केवळ पुण्यातच नव्हे, तर थेट राजस्थानात जाऊन हत्येची ‘रिहर्सल’ केल्याचं तपासात समोर आलं आहे. लग्न ठरल्याच्या पहिल्या दिवसापासूनच केतनला संपवण्याचे नियोजन कसे सुरू होते, याचा संपूर्ण पाढाच आता आरोपींनी पोलिसांसमोर वाचला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, सियाचे लग्न केतन अग्रवालसोबत निश्चित झाले होते. या लग्नातून कायमची मुक्तता मिळवण्यासाठी आणि केतनचा गेम करण्यासाठी या दोघांनी तब्बल ६ महिन्यांपूर्वीच प्लॅनिंग सुरू केले होते.
डिसेंबर २०२५ मध्ये सिया आणि चेतन हे दोघे राजस्थानातील जोधपूर येथील ऐतिहासिक ‘मेहरानगड’ किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. वरवर केवळ पर्यटनासाठी गेलेल्या या जोडप्याचा मुख्य हेतू मात्र अतिशय भयानक होता. एखाद्या उंच गडावरून माणसाला खाली ढकलून दिल्यास काय होते, अपघाताचा बनाव कसा करता येतो आणि स्वतः कसं सुरक्षित राहता येतं, या सर्व गोष्टींची थेट ‘लाईव्ह रिहर्सल’ त्यांनी मेहरानगडावर केली होती. हेच भयंकर कृत्य त्यांनी १८ जून रोजी लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर केतनच्या बाबतीत प्रत्यक्षात आणलं.
याबाबत समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या दिवशी सिया आणि केतन यांचे लग्न ठरले, त्या दिवसापासूनच सियाच्या मनात केतनबद्दल कोणतीही आपुलकी नव्हती. तिने आणि चेतनने त्याच दिवसापासून केतनला आपल्या आयुष्यातून कायमचे कसे हटवायचे, याचे नियोजन सुरू केले होते. लग्नाची तयारी जशी अंतिम टप्प्यात येत होती, तसा त्यांचा हत्येचा कट अधिक तीव्र होत गेला.
१८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून ढकलून देऊन केतनची हत्या केल्यानंतर, सुरुवातीला हा केवळ एक दुर्दैवी अपघात असल्याचा बनाव सिया आणि चेतनने रचला होता. पोलीस कोठडीत गेल्यानंतरही हे दोघे अत्यंत शातीरपणे वागत होते. पोलीस तपासाची दिशा भरकटवण्यासाठी दोघेही सुरुवातीला एकमेकांवर दोषारोप करत होते. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी जेव्हा ‘पोलिसी खाक्या’ दाखवल्या तेव्हा या दोघांनी पोपटासारखं बोलायला सुरूवात केली. कसून केलेल्या चौकशीत अखेर या दोघांनी मेहरानगडावरील सरावापासून ते लोहगडावरील खूनी खेळापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांसमोर जसाच्या तसा उघड केला.लोकमतने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या धक्कादायक खुलाशामुळे पोलीस प्रशासनही चक्रावून गेले आहे.
Pune,Maharashtra
Jun 29, 2026 12:07 PM IST
लग्न ठरल्याच्या दिवसापासून ठरलेला प्लॅन; राजस्थानच्या त्या गडावर 6 महिन्यांपूर्वीच चेतन-सियाने केला सराव, तपासात नवे खुलासे
