Last Updated:
आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या हजारो वारकऱ्यांच्या पाऊली विठ्ठल नामाचा गजर करत हा वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेनं निघाले आहेत. पारंपारिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जळगाव शहरासह जिल्ह्यातील भाविकांनी सकाळपासूनच श्रीराम मंदिरात प्रचंड गर्दी केली होती.
जळगाव नितीन नांदुरकर: “ज्ञानोबा माऊली तुकाराम आदिमाय मुक्ताबाई…” या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने आज जळगाव नगरी दुमदुमून गेली. जळगाव शहरातील मानाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानच्या तब्बल १५४ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे आज पंढरपूरकडे अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात प्रस्थान झाले. आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या हजारो वारकऱ्यांच्या पाऊली विठ्ठल नामाचा गजर करत हा वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेकडे प्रस्थान करत आहेत. पारंपारिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जळगाव शहरासह जिल्ह्यातील भाविकांनी सकाळपासूनच श्रीराम मंदिरात प्रचंड गर्दी केली होती.
जळगावच्या या मानाच्या पालखीला दीड शतकाहून अधिक काळाचा गौरवशाली इतिहास आहे. आज मंदिरातून पालखी बाहेर पडताच अवघा परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या माऊली आणि हातात भगव्या पताका घेतलेले वारकरी वारीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. हा पालखी सोहळा पुढील २६ दिवसांचा पायी प्रवास करत, ऊन-पावसाची पर्वा न करता, विठ्ठल नामाच्या ऊर्जेवर पंढरपुरात पोहोचणार आहे.
पालखी प्रस्थानाच्या वेळी ढोल-ताशांचा गजर, हरिनामाचा गजर आणि वारकऱ्यांचे रिंगण पाहून उपस्थित जळगावकरांचे डोळे भक्तीभावाने पाणावले होते. “१५४ वर्षे ही परंपरा अखंड सुरू आहे आणि दरवर्षी मुक्ताईंच्या पालखीला निरोप देताना जळगावकर भावूक होतात,” अशी भावना स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.
मुक्ताईंची ही पालखी मार्गस्थ होताना वाटेत विविध ठिकाणी तिचे जंगी आणि भावपूर्ण स्वागत केले जाणार आहे. आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी आता जळगावची ही पालखी विठ्ठल चरणी लीन होण्यासाठी मार्गस्थ झाली असून, यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात वारीचे चैतन्य पसरले आहे.
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
२६ दिवसांचा पायी प्रवास अन् विठूची आस; जळगावच्या श्रीराम मंदिरातून मुक्ताई पालखीचे पंढरीकडे प्रस्थान
