‘लॉक अप’ या बहुचर्चित शोचा दुसरा सिझन नुकताच सुरू झाला आहे. यंदाच्या सिझनमध्ये एकापेक्षा एक दमदार स्पर्धक सहभागी झाले आहेत. यात अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाचाही समावेश होता. शोच्या प्रीमिअरमध्येच सुनीताने पुन्हा एकदा तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. सूत्रसंचालक फराह खान आणि रितेश देशमुख यांच्याशी बोलताना सुनीताने तिच्या खासगी आयुष्याशी संबंधित जुन्या अफवांवर मोकळेपणे भाष्य केलं. त्याचसोबत तिने पती गोविंदाच्या कथित अफेअर्सबद्दलही थक्क करणारे दावे केले आहेत.
गोविंदाबद्दल सुनीता म्हणाली, “जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता, तेव्हा तुम्हाला सर्वकाही सहन करावं लागतं. चीचीच्या (गोविंदा) आयुष्यात किती अफेअर्स होते? अभिनेते आणि अभिनेत्रींचे अफेअर्स असतात, ठीक आहे. मला असं वाटतं की, इतक्या वर्षांपर्यंत चीचीची साथ दिल्यानंतर पुढच्या जन्मी त्याची मुलगी बनण्याचा मला हक्क आहे (हसते). जोपर्यंत पती आणि पत्नी एकत्र असतात, तोपर्यंत सर्वकाही ठीक असतं. पण जेव्हा त्यात तिसरी व्यक्ती येते, तेव्हा परिस्थिती बिघडते. मी कधीच खोटं बोलले नाही, हे पहा.. मी नेहमीच खरंच बोलते.”
‘लॉक अप 2’मध्ये सुनीता अहुजासोबतच राम कपूर, शिवांगी जोशी, आकांक्षा चमोला, योगेश रावत, रियाझ अली, धीरज धूपर, श्रेया कालरा, सुफी मोतीवाला आणि इतरही अनेकजण सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा हे लग्नाच्या 38 वर्षांनंतर विभक्त होण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आम्ही दोघं वेगवेगळे राहतोय, अशी कबुली खुद्द सुनिताने दिली होती. इतकंच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी सुनिताने गोविंदाला घटस्फोटाची नोटीसदेखील पाठवल्याची माहिती त्यांच्या वकिलाने दिली होती. परंतु नंतर दोघांनी या नात्याला आणखी वेळ देण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या घटस्फोटामागचं कारण गोविंदाचं विवाहबाह्य संबंध असल्याचंही म्हटलं गेलं होतं.
बीकॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत असताना गोविंदाची भेट सुनिता अहुजाशी झाली होती. त्यावेळी सुनिता नववीत शिकत होती. सुनिता तेव्हा तिच्या बहिणीच्या घरी राहत होती आणि सुनिताच्या बहिणीने गोविंदाच्या मामाशी लग्न केलं होतं. गोविंदा आणि सुनिताच्या नात्याची सुरुवात फार काही सकारात्मक नव्हती, परंतु हळूहळू दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. बॉलिवूड इंडस्ट्रीत सुपरस्टार बनण्याआधीच गोविंदाने सुनिताशी लग्न केलं होतं. 1986 मध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर चार वर्षांपर्यंत या दोघांनी त्यांच्या नात्याला सर्वांपासून लपवून ठेवलं होतं.