भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेचा दुसरा सामना आज रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना तर भारतीय संघाने गमावला पण आता दुसरा सामना जिंकून मालिका वाचवण्याचे आव्हान असणार आहे. भारत आणि आयर्लंड या दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशी खेळणार की नाही आता याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आता दुसऱ्या आणि अंतिम सामन्यापूर्वी एक लक्षवेधी वक्तव्य समोर आले आहे, ज्याने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडकडून शानदार पदार्पण करणाऱ्या भारतीय वंशाच्या वेगवान गोलंदाज जय मुंद्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयर्लंडसाठी आपल्या पदार्पणाच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जय मुंद्रा म्हणाला की, “वैभव सूर्यवंशीच्या प्रतिभेला दाद दिली. वय हा केवळ एक आकडा आहे. तो भारतासाठी खेळत आहे आणि लवकरच त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते. आपण सर्वांनी त्याची प्रचंड क्षमता पाहिली आहे आणि त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. वयाचा विचार बाजूला ठेवल्यास, तो मैदानावर मोठा प्रभाव टाकू शकतो. तो सध्या जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवत आहे आणि तो किती चांगला खेळाडू आहे हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येकजण त्याच्यावर प्रेम करतो आणि इथे आयर्लंडमध्येही लोकांना त्याला खेळताना पाहायचे आहे.”
मालिकेच्या पहिल्या सामन्यात, वैभव सूर्यवंशीचा भारताच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये समावेश होईल अशी क्रिकेट चाहत्यांना आशा होती, पण त्याची निवड झाली नाही. आता, पहिला सामना गमावल्यानंतर, भारतीय संघावर मालिका वाचवण्याचा प्रचंड दबाव आहे आणि हा सामना ‘करा किंवा मरा’ अशी लढाई बनली आहे. कर्णधार श्रेयस अय्यर या युवा फलंदाजाला दुसऱ्या सामन्यात पदार्पणाची संधी देतो की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात आयर्लंडसाठी पदार्पण करणाऱ्या जय मुंद्राने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याने आपल्या चार षटकांत केवळ 25 धावा देऊन दोन महत्त्वपूर्ण बळी घेतले. यादरम्यान, त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर बळी घेण्याचा अनोखा आणि ऐतिहासिक पराक्रमही केला, ज्यामुळे आयर्लंडला भारताविरुद्ध पहिला विजय मिळवण्यात मदत झाली.