देशाच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. हा ऋतू अनेक लोकांना प्रवासाकडे आकर्षित करतो. कारण पावसाळ्याच्या ऋतूत डोंगर, धबधबे आणि हिरवीगार वनराई अधिकच सुंदर दिसू लागते, ज्यामुळे लोकं सुट्ट्यां घेऊन बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन करत असतात. मात्र हा पावसाळा जेवढा सुंदर वाटतो तेवढाच काही आव्हानेही घेऊन येतो. या काळात हवामानातील अचानक बदल, पाणी साचणे आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात फिरायला जाताना अधिक खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.
लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि ज्यांना आधीपासूनच आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांनी विशेषतः आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कधीकधी काहीजण आरोग्यासोबतच इतर कोणतीही तयारी न करताच बाहेर फिरायला जायला निघतात, ज्यामुळे लहान समस्या मोठी रूप घेते. योग्य नियोजन आणि सावधगिरी बाळगल्यास, पावसाळ्यातील प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यातील प्रवासादरम्यान कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात आणि निरोगी व सुरक्षित राहण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
पावसाळ्यात प्रवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
पावसाळ्यात प्रवास करण्यापूर्वी हवामानाचा अंदाज तपासा. मुसळधार पाऊस, भूस्खलन किंवा पाणी साचण्याची शक्यता असलेले भाग टाळा. अत्यावश्यक औषधे, अतिरिक्त कपडे, रेनकोट, छत्री आणि वॉटरप्रुफ पिशवी सोबत ठेवा. बाहेर खाण्याऐवजी स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करण्याकडे लक्ष द्या. पिण्यासाठी नेहमी सुरक्षित आणि पॅकेज केलेले पाणी वापरा. प्रवास करताना आरामदायक आणि न घसरणारे बूट घाला.
तसेच तुमचा मोबाईल फोन, पॉवर बँक आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा. मुलांसोबत किंवा वृद्ध व्यक्तींसोबत प्रवास करत असाल, तर त्यांच्या गरजांकडे विशेष लक्ष द्या आणि गरज पडल्यास तुमच्या प्रवासाच्या योजना बदलण्यास अजिबात संकोच करू नका.
कोणत्या आरोग्य समस्यांमुळे पावसात प्रवास करण्याचा धोका वाढू शकतो?
पावसाळ्यात प्रवासादरम्यान पोटाचे विकार, अन्नातून विषबाधा, सर्दी, ताप, त्वचेचे संक्रमण यांचा धोका वाढू शकतो. पावसाचे पाणी आणि धुळीच्या संपर्कामुळे काही लोकांमध्ये ॲलर्जी आणि बुरशीजन्य संसर्ग देखील होऊ शकतो.
याव्यतिरिक्त जास्त वेळ ओले कपडे किंवा बूट घालून राहिल्याने त्वचेच्या समस्या वाढू शकतात. ताप, जुलाब, उलट्या, अशक्तपणा किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे आढळल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पावसाळ्यात सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी काय करावे?
पावसाळ्यात प्रवास करताना स्वच्छतेचे पालन करा आणि वारंवार हात धुवा. भरपूर पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या. अतिश्रम टाळा आणि पुरेशी विश्रांती घ्या.
याव्यतिरिक्त हवामानानुसार नेहमी योग्य कपडे घाला आणि गरज पडल्यास प्रवासाचे नियोजन बदला. साध्या खबरदारी घेतल्यास पावसाळ्यातील प्रवास सुरक्षित, आरामदायक आणि आनंददायक होऊ शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)