लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाइन आहे, दररोज लाखो लोक लोकलने प्रवास करतात. याच लोकलमध्ये मंगळवारी, 23 जूनच्या रात्री रक्तरंजित प्रकार घडला, ज्याने सगळेच हादरले आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर धावत्या लोकलमध्ये किरकोळ वादातून एका तरूणाची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली आहे. चर्चगेट ते नालासोपारा फास्ट लोकलमध्ये बोरीवलीच्या आसपास ही अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. अशातच आता या प्रकरणी जीआरपीने मोठी कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आरोपीला घेतले ताब्यात
मुंबईतील बोरिवली लोकल ट्रेन हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला जीआरपीने ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव रोशन सुवर्णा आहे. हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता. सध्या रेल्वे पोलिसांनी आरोपी रोशन सुवर्णाला ताब्यात घेतले असून त्याला बोरिवली जीआरपी ठाण्यात आणले जात आहे. आरोपीच्या अटकेनंतर बोरिवली जीआरपी या प्रकरणी पत्रकार परिषद देखील घेणार आहे.
23 जूनच्या रात्री घडली घटना
समोर आलेल्या माहितीनुसार किरकोळ वादातून 22 वर्षीय मयंक लोहार या तरुणाची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली. मुसळधार पावसादरम्यान लोकल ट्रेनच्या डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून आरोपी आणि मृत तरुणामध्ये वाद झाला होता. वाद इतका वाढला की आरोपीने बॅगमधून चाकू काढून तरुणाच्या पोटात वार केला. ही घटना 23 जूनच्या रात्री चर्चगेट ते नालासोपारा फास्ट लोकल ट्रेनमध्ये अंधेरी ते बोरिवली दरम्यान घडली. या घटनेनंतर बोरिवली जीआरपीने गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता, आता या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले आहे.
आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
मयत मयंक लोहार हा विरार पूर्व येखील सुरम पार्क मधील अमरनाथ बिल्डिंग मधील तिसऱ्या मजल्यावर कुटुंबासह राहत होता. अंधेरीच्या वेस्टसाईडमध्ये तो सेल्समन म्हणून काम करायचा. मयंकच्या हत्येने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयंकला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.