हिंगोली : नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीत (Nanded Vidhan Parishad Election) भाजपचे उमेदवार अमर राजुरकर यांनी मोठा विजय मिळवला असून त्यांनी नुकतंच ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा आष्टीकर यांचा पराभव केला. या पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून कृष्णा आष्टीकर (Krishna Patil Ashtikar) यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली. त्यामुळे बापाच्या भूमिकेचा फटका हा मुलाला बसल्याची चर्चा आता सुरू आहे.
नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या अमर राजुरकर यांना 339 मतं मिळाली. तर ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडणूक लढवणाऱ्या कृष्णा आष्टीकरांना फक्त 84 मतं मिळाली. या निवडणुकीत 23 मतं बाद झाली आहेत.
नांदेडच्या जागेसाठी आधी कांग्रेसच्या रामदास पाटील सोमठाणकर यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार नागेश पाटील आष्टीकरांचे सुपुत्र कृष्णा आष्टीकर हे इच्छुक होते. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या रामदास पाटील यांनी उमेदवारी मागे घेतली आणि महाविकास आघाडीकडून कृष्णा आष्टीकर हे अधिकृत उमेदवार झाले.
Krishna Patil Ashtikar Result : ऑपरेशन टायगरचा फटका
दरम्यान, ही निवडणूक प्रक्रिया सुरू असताना राज्यात ऑपरेशन टायगर सुरू झालं. त्यामध्ये नागेश पाटील आष्टीकरांचं नाव असल्याने त्याचा फटका कृष्णा आष्टीकरांना बसला. कृष्णा आष्टीकर हे आपण ठाकरे गटातच असल्याचं सांगत असले तरी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चलबिचलता सुरू झाल्याचं दिसून आलं.
राज्यात सुरू झालेल्या ऑपरेशन टायगरचा फटका हा कृष्णा आष्टीकरांना बसला असून महाविकास आघाडीची मतं ही अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजुरकर यांच्या पारड्यात पडल्याची चर्चा आहे. त्यामुळे 451 मतांपैकी कृष्णा आष्टीकर यांना फक्त 84 मतं मिळाल्याचं दिसून आलं.
दरम्यान, कृष्णा पाटील आष्टीकरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलं. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Nagesh Patil Ashtikar Hingoli : कृष्णा पाटील आष्टीकरांची भूमिका बदलली
दरम्यान, वडिलांनी बंडखोरी केली असली तरी आपण ठाकरेंसोबत असल्याचा दावा करणाऱ्या कृष्णा पाटील आष्टीकर यांची भूमिका बदलल्याचं दिसून आलं. विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपण वडिलांच्या विरोधात जाणार नाही, असं कृष्णा पाटील यांनी जाहीर केलं. संध्याकाळी वडील हिंगोलीत दाखल होणार असून त्यांचं नांदेड विमानतळावर जंगी स्वागत करू, असं कृष्णा आष्टीकर यांनी म्हटलं आहे. माझ्यावर ज्या लोकांनी टीका केली होती त्यांच्यासमोर वडिलांचं नांदेड विमानतळावर स्वागत करणार, असं आष्टीकर म्हणाले.
ही बातमी वाचा:
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story