Vaibhav Sooryavanshi Next Series vs Ireland : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एका 15 वर्षीय युवा खेळाडूची जोरदार चर्चा सुरू आहे, तो खेळाडू म्हणजे बिहारचा युवा सनसनी फलंदाज वैभव सूर्यवंशी. आपल्या वादळी फलंदाजीने आणि गोलंदाजांच्या मनात धडकी भरवण्याच्या कौशल्याने वैभवने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. दबावाच्या परिस्थितीतही उत्कृष्ट कामगिरी करण्याची त्याची कला त्याला इतर खेळाडूंपेक्षा वेगळे ठरवते.
आयर्लंड दौऱ्यात होणार आंतरराष्ट्रीय पदार्पण? (Vaibhav sooryavanshi can international debut Ireland series)
भारतीय क्रिकेट संघ लवकरच आयर्लंड दौऱ्यावर (IND vs IRE) जात असून, तिथे दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 26 जून रोजी तर दुसरा सामना 28 जून रोजी होणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता बेलफास्ट येथे खेळवले जातील.
क्रिकेट वर्तुळात अशा चर्चा आहेत की, 26 जून रोजी होणाऱ्या पहिल्याच टी-20 सामन्यातून वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. जर असे झाले, तर अवघ्या 15 व्या वर्षी पदार्पण करून वैभव महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा भारतासाठी सर्वात तरुण वयात पदार्पण करण्याचा ऐतिहासिक विक्रम मोडीत काढेल. आयर्लंडनंतर भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धही मालिका खेळायची असून, या दोन्ही दौऱ्यांसाठी वैभवची भारतीय संघात निवड झाली आहे.
नॉकआउट सामन्यांचा नवा ‘किंग’
वैभवची सर्वात मोठी ताकद म्हणजे कठीण प्रसंगातही तो अधिक चांगला खेळ करतो. म्हणूनच त्याला ज्युनियर क्रिकेटमध्ये ‘नॉकआउट सामन्यांचा नवा किंग’ म्हटले जात आहे. त्याने 5 नॉकआउट सामन्यांमध्ये 4 अर्धशतके आणि 1 धडाकेबाज शतक झळकावले आहे. विशेष म्हणजे, 3 वेळा तो 90 पेक्षा जास्त धावांवर बाद झाला. शतकाच्या जवळ असूनही तो वैयक्तिक धावांसाठी संथ न खेळता संघासाठी आक्रमक फलंदाजी करत राहिला, जे त्याच्या परिपक्वतेचे लक्षण आहे.
श्रीलंकेविरुद्ध फायनलमध्ये दाखवला दम (Sri Lanka vs India Final Tri Nation A Series)
रविवार 21 जून रोजी झालेल्या श्रीलंका अ विरुद्धच्या तिंरगा मालिकेच्या फायनल सामन्यात वैभवने श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. या अंतिम सामन्यात त्याने आपल्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर सर्वांची मने जिंकली आणि भारताला विजय मिळवून दिला. आता सर्व क्रिकेट चाहत्यांचे डोळे 26 जूनला होणाऱ्या भारत विरुद्ध आयर्लंड सामन्याकडे लागले आहेत, जिथे हा तरुण खेळाडू नवा इतिहास रचण्यास सज्ज आहे.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला