Last Updated:
महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे. या सामन्यात टीम इंडियाकडून 21 वर्षांची पोरगी एकटी लढली, पण तिला इतर कुणाचीही साथ मिळाली नाही.
मुंबई : महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे. भारताने दिलेलं 159 रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं. मेरिझेन काप दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाची शिल्पकार ठरली. मेरिझेनने 45 बॉलमध्ये 180 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 81 रन केले, ज्यात 7 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता.
मेरिझेन कापशिवाय तझमिन ब्रिट्सने 40 रनची खेळी केली. भारताकडून 21 वर्षांची श्री चरिणी एकटी लढली. पॉवर प्लेची शेवटची म्हणजेच सहावी ओव्हर श्री चरिणीने डबल विकेट मेडन टाकली. सहाव्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला श्री चरिणीने लॉरा वॉलवार्डला 20 रनवर आऊट केलं, यानंतर याच ओव्हरच्या चौथ्या बॉलला तिने ऍनरी डेर्कसनला 0 रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. पॉवर प्लेची ही ओव्हर श्री चरिणीने मेडन टाकली. यानंतर 18व्या ओव्हरमध्ये श्री चरिणीने आणखी एक विकेट घेतली. नदिने डे क्लार्क 5 रनवर बोल्ड झाली.
श्री चरिणीने तिच्या 4 ओव्हरमध्ये फक्त 24 रन देऊन 3 विकेट घेतल्या, पण तिला टीममधल्या इतर कोणत्याच खेळाडूकडून साथ मिळाली नाही. श्री चरिणीशिवाय शफाली वर्माला एक विकेट घेण्यात यश आलं.
टॉस जिंकूनही टीम इंडियाचा पराभव
या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी आक्रमक सुरूवात केली, पण स्मृती मंधाना 17 रनवर मेरिझेन कापच्या बॉलिंगवर बोल्ड झाली. तर शफालीने 15 बॉल 31 रन केले. याशिवाय दीप्ती शर्माने 21 बॉल 29 रनची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून मेरिझेन कापला 2, शबनिम इस्माईलला 2, विकेट मिळाल्या. तर मलाबा, खाका आणि नदिने डे क्लार्क यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या पराभवानंतर टीम इंडिया पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. 3 सामन्यांनंतर टीम इंडियाचा हा पहिलाच पराभव आहे. याआधी भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा पराभव केला होता.
Mumbai,Maharashtra
Jun 21, 2026 10:52 PM IST
