Last Updated:
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात हृदयद्रावक अपघात घडला. विवाहमांडवा–चौंडाळा रोडवर दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर, अविनाश कानडजे, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पैठणमधील विवाहमांडवा ते चौंडाळा रोडवर दुचाकी आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अंगावर काटा आणणाऱ्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. आठवडी बाजार करून आनंदाने घरी परतणाऱ्या निष्पाप चव्हाण कुटुंबियांचा संसार या एका भीषण अपघातामुळे एका क्षणात उद्ध्वस्त झाला आहे.
बाजार करून घरी परतताना काळाचा घाला
चव्हाण कुटुंब पाचोड येथील आठवडी बाजार करण्यासाठी गेले होते. बाजारातून घरगुती सामान खरेदी केल्यानंतर ते सर्वजण एकाच दुचाकीवरून खंडाळा येथील आपल्या पारधी वस्तीकडे परत जात होते. दुचाकी विवाहमांडवा-चौंडाळा रोडवरून जात असताना, समोरून येणाऱ्या एका वेगवान पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चारही जण रस्त्यावर दूरवर फेकले गेले.
दोन महिला, एक पुरुष आणि चिमुकल्याचा जागीच अंत
या अत्यंत भीषण अपघातामध्ये दुचाकीवर सवार असलेल्या दोन महिला, एक पुरुष आणि एका पाच वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. संपूर्ण कुटुंब या अपघातात संपल्याने खंडाळा येथील पारधी वस्ती आणि पाचोड परिसरात प्रचंड मोठी शोककळा पसरली आहे.
एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले
अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, आसपासच्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. रस्त्यावर पडलेला रक्ताचा सडा आणि एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. या अपघातानंतर रस्त्यावर नागरिकांची, बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात
घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी तात्काळ ताफा घेऊन घटनास्थळ गाठले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले असून, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
Aurangabad,Maharashtra
