‘हे उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असं म्हणण्यासारखं, आता राहिलाच कोणता राजीनामा?’ मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख सोडण्यावरून खोचक टोला


Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: मी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देऊन सामान्य शिवसैनिकाला त्या पदावर बसवायला तयार असल्याचे मोठं वक्तव्य  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिन सोहळ्यात म्हटले होते. या वक्तव्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे. त्या वक्तव्याचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असं म्हणण्यासारखं हे आहे. आता राहिलाच कोणता राजीनामा? ती वेळ का आली? अशी विचारणा फडणवीस यांनी केली. 

शिवसेना हा संपत्तीचा नाही, विचारांचा वारसा

फडणवीस पुढे म्हणाले की, “शिवसेना म्हणजे पक्ष नाही, तर तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे आणि तो संपत्तीचा वारसा नाही तर विचारांचा वारसा आहे. तो विचारांचा वारसा ज्या क्षणी त्यांनी सोडला, त्या क्षणी विचार मान्य असणारे सगळे वेगळे झाले. ज्यावेळी आत्मचिंतन करण्याची गरज होती, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन केलं नाही, हा त्याचा परिणाम आहे. बाळासाहेबांची शिवसेना आता एकनाथराव शिंदे चालवत आहेत आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण व विचार त्यांच्याच सोबत आहेत, असे फडणवीस म्हणाले. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या संपूर्ण भाषणात भाजप आणि शिंदे सेनेला लक्ष्य केले. तसेच शिंदे सेनेसोबत जाणाऱ्या सहा खासदारांवरही टीकास्त्र सोडले. मात्र, आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी अचानकपणे शिवसेना पक्षप्रमुख पदावरुन पायउतार होण्याची भाषा केल्याने अनेकांना धक्का बसला. मी कसा आहे, तुम्हाला माहिती आहे. माझ्यावर बोट दाखवलं तर मी एक क्षण पदावर राहत नाही, हे तुम्ही मी मुख्यमंत्रिपद सोडलं तेव्हा पाहिलं आहे. मला पदाची हाव असती तर मी विधान परिषदेत गेलो असतो. आता शिवसेना पक्षाला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. मी देखील गेली 12-13 वर्षे संघटनेचे नेतृत्व करत आहे. आता माझ्या नेतृत्त्वावर आरोप होत असतील तर मी या पदावरुन उतरायला तयार आहे. याचं उत्तर विचार करुन द्या.

ते म्हणाले होते की, माझ्यावरील आरोप तुम्हाला खरे वाटत असतील तर मी पद सोडायला तयार आहे. फक्त अट एकच आहे की, ही सोन्यासारखी शिवसेना दरोडेखोर आणि गद्दारांच्या हातात जाऊन द्यायची नाही. माझ्यावर कोणी आरोप करत असेल तर त्याला उत्तर तुम्ही द्यायचं आहे. मला नेतृत्त्वाची हाव नाही. त्यामुळे मी पद सोडायला तयार आहे. बाकी मी डगमगलेलो नाही, खचलेलो नाही. अनेक संकटं आणि वादळं आली तरी मी पहाडासारखा उभा राहीन. पण ज्यावेळी मी पद सोडावं असं तुम्हाला वाटेल तेव्हा मी पद सोडल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *