शिवसेना एकच, दुसरा शिवसेनाप्रमुख होऊच शकत नाही; उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर – Marathi News | Uddhav Thackeray criticizes Amit Shah in North East Mumbai without naming him.


शिवसेनेला चार वर्षातून दुसऱ्यांदा फुटीला सामोरे जावे लागले असताना आज उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबई लोकसभ मतदार संघातून आपला दौरा सुरु केला आहे. त्यांनी रविवारी सायंकाळी भांडुप येथील जुन्या जाणत्या शिवसैनिकांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी भांडुप येथे जाऊन जनतेची माफी मागितली. जिथे जिथे गद्दारी झाली तेथे आम्ही माफी मागत आहोत असे ते म्हणाले.

मला तुम्ही नुसते शिवसैनिक दिसत नाहीए.. तर पेटलेल्या मशाली दिसत आहात. गद्दार आणि गद्दारांच्या बापाला धन्यवाद देईन. तुम्ही मशाली पुन्हा पेटवल्या. परवा मी जे बोललो ते करणार आहे. सुरुवात इथून करणार आहे. गद्दारी झाली तिथे जाऊन मी मतदारांची माफी मागतो अशी सुरुवात शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. ते म्हणाले की तुम्ही माझा आदेश मानून उमेदवार आणि मशाल पाहून रक्ताचं पाणी केलं आणि निवडून दिलं. उमेदवार मी दिले. चूक माझी आहे. मी माफी मागतो असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

अनेक वर्षापासून शिवसेना फोडली जात आहे. कमजोर होईल याचा प्रयत्न केला. या वाटचालीतील तुम्ही साक्षीदार आणि कर्तेकरविते आहात. कारणं अनेक दिली जातात. भाजपला गल्लीतील कुत्रं विचारत नव्हतं. बोट धरून आपण त्यांना मोठं केलं. डिपॉझिट जप्त पार्टी म्हणत होते. भाजपा,भाडखाऊ.. तसेच लोकं आहेत ते. दुसऱ्यांची पोरं घेऊन मोठी झालेली पार्टी. काँग्रेसबरोबरच्या वैऱ्यात आपली कारकीर्द गेली. पण काँग्रेसने शिवसेना तोडली नाही. संपवली नाही. तो प्रयत्न भाजपने केला. हे भाजपचं पाप आहे असाही थेट आरोप ठाकरे यांनी यावेळी केला.

उद्धव ठाकरे यावेळी त्वेषाने म्हणाले की काल एक उपरा सोलापुरात येऊन गेला. त्याने नवीन शोध लावला. आजपासून शिवसेना एकच आहे. शिवसेना एकच आहे. ती आमची बाळासाहेबांची आहे. त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष सोम्या गोम्या होऊ शकतो हे उपऱ्याला माहीत नाही. पण शिवसेनाप्रमुख एकच होऊ शकतो. दुसरं कोणी नाही. तू बसला अध्यक्षपदी. तसा आज दुसरा बसवला. भाजपला कोणतंही ध्यान चालतं.

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली हे उपऱ्याला माहीत नाही. त्या शिवसेनेचा प्रमुख कोण हे उपरा ठरवू शकत नाही. तू उपरा आहेस, उपटसुंभा आहे. तु तुझ्या औकातीत राहा. खुर्ची तुझ्या बुडाखाली आहे म्हणून लोक घाबरतात. मला कोणत्याही सुरक्षेची गरज नाही. मला आई जगदंबेने दिलेलं सुरक्षा कवच आहे.

मी जनतेत जाऊ शकतो..

मी जनतेत जाऊ शकतो. हे उपरे जाऊ शकत नाही. त्यांनी त्यांचं घर बघावं. पंतप्रधान पदाचं स्वप्न पडत असेल म्हणून दुसऱ्यांचे खासदार फोडून स्वत:चा खुंटा बळकट करत असतील तर तुमच्या खुंट्याला मुळं आहेत का बघा अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.  ते पुढे म्हणाले की पहिलं मुळं आहेत का ते बघा. नुसता खुंटा लावला. बाकी खाली काय. भाजप कशासाठी फोडत आहे. मिंध्याला विचारतो त्याने दाढी वाढते का. दाढीचे केस खरे आहे की दुसऱ्यांकडून घेतले आहेत. नाटकवाल्याकडून. स्वत:मध्ये कर्तृत्व नसेल तर अशी वेळ येते अशी झोंबरी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचे नाव न घेता केली.

दिसेल तिथे या बंडखोरांना हाणा –  संजय राऊत

या खंडखोरांना जिथे दिसतील तेथे हाणा असा आदेशच दिला. शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं. तुम्हाला गटारातून उचलून  दिल्लीला नेलं. नाहीतर तुम्ही कोण होता असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावेळी केला.  ते पुढे म्हणाले की  तुम्ही मशालीवर निवडून आला आहात. मतं उद्धव ठाकरेंना पडलेली आहेत. तुम्हाला पडलेली नाही
ही मतं भाजप-मिंधेंच्या विरोधातली होती. तुम्ही लाखो मतदारांचा अपमान केला आहे. आम्ही पटत नाही तर पदाचा राजीनामा द्या आणि हवं त्या उकीरड्यावर जा असाही सल्ला राऊत यांनी यावेळी बंडखोरांना दिला.

हिंमत असेल तर या मतदारसंघात उभे राहून दाखवा. निष्ठावंत शिवसैनिक तुम्हाला आडवा केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही ऑपरेशन टायगर केलं म्हणता. म्हणजे आम्ही टायगर आहोत असं तुम्हीच म्हणताय. खासदार लांडग्यांच्या टोळीत गेले आहेत. तुम्हाला वायप्लस की काय सुरक्षा पाहिजे ती घ्या. आमचं ऑपरेशन तुडवा सुरु राहिल असेही राऊत यावेळी म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *