Last Updated:
Beed News: घरातील एका सदस्याने घडणाऱ्या प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेण्यात आला.
बीड: गेल्या काही काळात गुन्हेगारी घटनांनी बीड जिल्हा सातत्याने चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आता आणखी एका महिला सरपंचाला भयंकर प्रकाराचा सामना करावा लागत आहे. अवैध वाळू वाहतुकीची तक्रार केल्याच्या रागातून काहींनी घरात घुसून मारहाण करत धमकी दिली. तसेच दागिने आणि मोबाईल हिसकावून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
गेवराई तालुक्यातील नागझरी येथे ही धक्कादायक घटना घडली. सरपंच आश्विनी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गाव परिसरातील अवैध वाळू वाहतुकीबाबत यापूर्वीही काही व्यक्तींविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू होती. त्या प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी सातत्याने दबाव टाकला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या पती नारायण शिंदे यांनाही विविध माध्यमांतून धमक्या दिल्या जात होत्या. नारायण शिंदे हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून व्यवसायाने वकील आहेत.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास काही महिला सरपंचांच्या निवासस्थानी आल्या. त्यांनी घरात जबरदस्तीने प्रवेश करून कुटुंबीयांशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या वेळी सरपंचांच्या पतीला गुन्हा मागे घेण्यास सांगण्यात आले. तसे न केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. घरातील एका सदस्याने घडणाऱ्या प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या गोंधळादरम्यान सरपंचांच्या गळ्यातील सुमारे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून घेतल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे घरातील वातावरण अधिक तणावपूर्ण बनले. घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.
याच वेळी एका महिलेने स्वतःकडे आणलेली विषारी द्रव्याची बाटली तोंडाला लावण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मात्र उपस्थित नातेवाईकांनी प्रसंगावधान राखत ती बाटली तिच्याकडून काढून घेतली. या प्रकरणी जावेद उर्फ पप्पू चव्हाण, त्याची पत्नी, तसेच इतर काही महिलांसह एका अनोळखी महिलेविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गेवराई पोलिस पुढील तपास करत आहेत.
Bid (Beed),Bid,Maharashtra
