सहा खासदारांवर तत्काळ कारवाई नाहीच? किती दिवसांचा अल्टिमेटम? अरविंद सावंतांनी दिली मोठी अपडेट – Marathi News | Thackeray Group: No Immediate Action on 6 Defecting MPs; Sawant Reveals Plan


सहा खासदारांवर कारवाई कधी ? अरविंद सावंतांनी दिली मोठी अपडेट

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. ठाकरे गटाचे नऊपैकी सहा खासदार फुटले आहेत. पक्षाने बोलवलेल्या संसदीय समितीच्या बैठकीला हे खासदार आले नाहीत. व्हीप बजावूनही हे खासदार आले नाहीत. त्यामुळे या खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता या सहा खासदारांवर ठाकरे गट कारवाई करण्यासाठी काय पावलं उचलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी या कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या खासदारांवर तात्काळ कोणतीही कारवाई होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आठ दिवसानंतरच या खासदारांवर कारवाई होईल, असं चित्र सध्या आहे.

पक्षाच्या संसदीय दलाची बैठक झाल्यानंतर खासदार अरविंद सावंत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदारांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. बैठकीला उपस्थित न राहणं हा पक्षद्रोह आहे. या सर्व खासदारांना व्हीप बजावला होता, पण ते बैठकीला आले नाहीत. या सर्व खासदारांना आज संध्याकाळपर्यंत कारणे दाखवा नोटीस पाठवू. सात दिवसाच्या आत त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे, असं खासदार अरविंद सावंत म्हणाले.

लोकसभा अध्यक्षांना कळवणार

या खासदारांनी पार्टीचा व्हीप पाळला नाही. पार्टीच्या बैठकीला आले नाही, याची माहिती लोकसभा अध्यक्षांना दिली जाणार आहे, अशी माहितीही अरविंद सावंत यांनी दिली. तसेच या खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याची चर्चा आहे. अधिकृतपणे काहीच समोर आलं नाही. आम्ही व्हीप बजावला, आम्ही पत्रक काढलं, ते सर्व तुम्हाला दाखवलं. जर या सहा जणांनी वेगळा गट स्थापन केला असेल तर त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेलं पत्र दाखवावं. चोरी करणारे चोरी का दाखवत नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शरद यादवांची खासदारकी गेली होती

या खासदारांवर काय कारवाई करायची याबाबत आम्ही उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहोत. गैरहजर राहिल्यानंतर त्यावर काय कायदेशीर कारवाई करायची आहे, ती करण्यात येईल. मला अधिकार आहे. मी व्हीप बजावला, असं सांगतानाच राज्यसभेत शरद यादव सदस्य होते. त्यांच्या पक्षाला सोडून ते थेट गेले नव्हते. पण विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी भाषण केलं होतं. त्यांच्या पक्षाने अध्यक्षांना पत्र दिलं आणि त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावेळी लगेच त्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं, अशी माहितीही त्यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *