India vs Afghanistan Tri-Nation A Series : श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या तिंरगा एकदिवसीय मालिकेत इंडिया-ए संघाने तुफानी कामगिरीच्या जोरावर फायनलमध्ये धडक मारली. मालिकेतील पाचव्या सामन्यात इंडिया-ए संघाने अफगाणिस्तान-ए चा तब्बल 101 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. दांबुला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने केवळ आपल्या मागील पराभवाचा बदलाच घेतला नाही, तर 4 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
भारतीय फलंदाजांची दमदार कामगिरी
या सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून भारताला आधी फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंडिया-ए ची सुरुवात अत्यंत वादळी झाली. युवा सलामीवीर प्रियांश आर्यने 58 धावा आणि वैभव सूर्यवंशीने 38 धावा करत पहिल्या विकेटसाठी अवघ्या 8 षटकांत 75 धावांची तुफानी भागीदारी केली. प्रियांशने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 1 षटकार ठोकला.
सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार तिलक वर्मा आणि यष्टिरक्षक फलंदाज कुमार कुशाग्र यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 104 धावांची शतकीय भागीदारी रचली. तिलक वर्माने 59 धावा तर कुमार कुशाग्रने 58 धावांचे योगदान दिले. डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये विपराज निगमने 20 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने वेगाने 30 धावा केल्या. यामुळे भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 9 गडी गमावून 319 धावांचा विशाल डोंगर उभा केला. अफगाणिस्तान-ए कडून फरीदून दाऊदजई, अब्दुल्ला अहमदजई आणि फरमानुल्लाह सफी यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.
INTO THE FINALS 👏
India A clinch a magnificent 1️⃣0️⃣1️⃣-run win over Afghanistan A to book their spot in the finals of the #TriNationSeries 💙
Scorecard ▶️ https://t.co/Kg9IWt7M5b#INDAvAFGA pic.twitter.com/kZ6YL4ngod
— BCCI (@BCCI) June 17, 2026
निशांत सिंधूच्या फिरकीची जादू
320 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तान-ए ची सुरुवात खराब झाली. यश ठाकूरने तिसऱ्याच षटकात हसन ईसाखिलला (14) बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर कर्णधार इम्रान मीर (32) आणि खालिद तनीवाल (13) हे देखील स्वस्तात माघारी परतले.
एकवेळ बहिर शाह (57) आणि फैसल शिनोजादा (46) यांनी चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी करून अफगाणिस्तानला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, विपराज निगमने बहिर शाहला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर अफगाणिस्तानची फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली.
भारतीय फिरकीपटू निशांत सिंधूने घातक गोलंदाजी करत अफगाणिस्तानच्या तळातल्या फलंदाजांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले. निशांतने 6.5 षटकांत अवघ्या 31 धावा देत 4 महत्त्वाचे बळी घेतले. त्याच्या या फिरकीच्या जोरावर अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 36.5 षटकांत 218 धावांवर गारद झाला आणि भारताने 101 धावांनी दिमाखदार विजय नोंदवला.
भारत अंतिम सामन्यासाठी कसा पात्र ठरला?
सलग दोन पराभव होऊनही इंडिया ए संघ अंतिम सामन्यासाठी नेमका कसा पात्र ठरला, असा प्रश्न कोणाला पडला असेल. पण भारताच्या 101 धावांच्या दणदणीत विजयामुळे संघाचा नेट रन रेट चांगला झाला आहे. तिन्ही संघांमध्ये सर्वोत्तम ठरला आणि परिणामी इंडिया ए संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला.
अंतिम सामन्यात ‘इंडिया ए’चा सामना कोणाशी होईल?
गुणतालिकेत श्रीलंका ए संघाचे पारडे अफगाणिस्तान ए संघाच्या तुलनेत चांगले आहे. त्यामुळे अत्यंत मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला नाही तर यजमान संघच अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. या स्पर्धेत इंडिया ए आणि श्रीलंका ए यांच्यात दोन अत्यंत चुरशीचे सामने झाले आहेत आणि जर अंतिम सामन्यात पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमनेसामने आले, तर तो सामना नक्कीच रंगतदार ठरेल.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला