ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत


नवी दिल्ली : शिवसेनेतील (Shivsena) ऑपरेशन टायगर पूर्ण झालं की नाही याबाबत अद्यापही दोन्ही पक्षाकडून भूमिका स्पष्ट नाही. याशिवाय, ठाकरेंचे खासदारही माध्यमांपुढे येऊ आपली भूमिका मांडताना दिसत नाही. त्यातच, खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाच्या खासदारांसाठी व्हिप बजावला असून उद्या खासदारांची बैठक असल्याची माहिती दिली होती. तसेच, आता राडा होईल म्हणत फुटणाऱ्या खासदारांना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट इशारा देखील दिला होता. आता, खासदार अरविंद सावंत (Arvind sawant) यांनी कुठलंही ऑपरेशन सक्सेस झालं नाही, सर्वच खासदार आमच्यासोबत असल्याचं म्हटलं. तर, दुसरीकडे आज झालेले ऑपरेशन टाइगर फुल प्रूफ झालं असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे. 

अरविंद सावंत यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले, ऑपरेशन टायगर म्हणायला हे त्यांना न शोभणारं आहे, शिवसेनेतील बंड म्हणजे अस्वलाच्या केसासारखे आहे, कितीही गेले तरी फरक पडत नाही. मात्र, जर ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय तर आम्हाला चेहरे दाखवा. कारण, जसे पश्चिम बंगालचे खासदार जाऊन भेटले, तसे यांनीही जाऊन भेटावं. गेलेच आहेत, तर अधिकृतपणे जाहीर करावं, असे म्हणत खासदार अरविंद सावंत यांनी ऑपरेशन टायगर फेल झाल्याचं म्हटलं. तसेच, आमचे सर्वच्या सर्व नऊ खासदार आमच्यासोबत आहेत, असा दावा देखील त्यांनी केला आहे. 

आम्ही बैठकीसाठी व्हिप बजावला असून उद्या आमचे खासदार बैठकीला उपस्थित राहतील, तेव्हा तुम्हाला कळेलच, असे म्हणत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ऑपरेशन टायगरवर आपली भूमिका मांडली. तसेच, दिल्लीत खासदार संजय राऊत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे, मी आणि उद्या संजय पाटील येतील, इतर खासदारही येतील असे देखील त्यांनी म्हटलं. 

संजय पाटील माझ्याशी बोलले

खोटा भ्रम पसरवला जात आहे, मला प्रामाणिक खासदारांबद्दल वाईट वाटतं, विनाकारण त्यांचीही नावं घेतली जातात. पण, सगळे खासदार आमच्यासोबत आहेत, कारण 14 तारखेलाच आम्ही त्यांच्याशी बोललो, 4 दिवसांपूर्वी बोललेली माणसं आज तसं करतील का? असा सवालही सावंत यांनी विचारला. संजय दिना पाटील यांच्याशी माझं बोलणं झालं, ते घरी आहेत. संजय पाटील यांनी मी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं सांगितलंय. तर, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत प्रश्न विचारला असता, ओमराजे निंबाळकरांशी माझा संपर्क झाला नाही, असेही सावंत यांनी म्हटले. आम्ही कशाला कोणावर अविश्वास दाखवू, आमच्या नेत्यांवर का अविश्वास दाखवू. काल आकडा 7 होता, सकाळी 6 पर्यंत आला होता. आता, हळूहळू आकडा कमी झाल्याचं दिसून येत आहे, असेही अरविंद सावंत यांनी म्हटले. 

हेही वाचा

ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *