Last Updated:
व्यापाऱ्यांनी दोन महिन्यांत संपूर्ण पैसे देण्याचे आश्वासन देत कोकाटे पाटील यांच्याकडून 127 क्विंटल हळद खरेदी केली. प्रतिक्विंटल 15 हजार 200 रुपये दराने झालेल्या या व्यवहाराची एकूण तब्बल 18 लाख 96 हजार 650 इतकी रक्कम…
सांगली: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बावची येथील हळद उत्पादक शेतकऱ्याची तब्बल 18 लाख 96 हजार 650 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हळद खरेदीच्या नावाखाली व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला मोठा आर्थिक गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बावची (ता. वाळवा) येथील शेतकरी दिनकरराव जगन्नाथ कोकाटे पाटील, (वय 62) यांच्या पोखर्णी येथील शेतात हळदीचे पीक होते. हळद विक्रीसाठी तयार असताना सांगलीतील व्यापारी सूरज रमजान जमादार आणि मुन्ना सूरज जमादार हे त्यांच्या संपर्कात आले. या व्यापाऱ्यांनी दोन महिन्यांत संपूर्ण पैसे देण्याचे आश्वासन देत कोकाटे पाटील यांच्याकडून 127 क्विंटल हळद खरेदी केली. प्रतिक्विंटल 15 हजार 200 रुपये दराने झालेल्या या व्यवहाराची एकूण तब्बल 18 लाख 96 हजार 650 इतकी रक्कम आहे.
विशेष म्हणजे या व्यवहारावेळी दोन साथीदार देखील उपस्थित होते. मात्र एक वर्ष उलटूनही पैसे मिळाले नाहीत. वारंवार पाठपुरावा करून देखील व्यापाऱ्यांकडून पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याने अखेर आष्टा पोलीस ठाण्यात व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास आष्टा पोलीस करत आहेत.
दरम्यान, फसवणुकीच्या घटनेमुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे. फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधी कठोर कारवाईची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.
Sangli,Maharashtra
2 महिन्यामध्ये पैसे देतो म्हणून सांगितलं, हळद व्यापाऱ्याने शेतकर्याला 19 लाखांना फसवलं!
