Last Updated:
ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाने समृद्ध असलेल्या पुणे शहराची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे विशेष हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे : ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाने समृद्ध असलेल्या पुणे शहराची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे विशेष हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. हा वारसा फेरी कार्यक्रम शनिवार, दि. 20 जून आणि रविवार, दि. 21 जून रोजी सकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला असून पुणेकरांना शहराच्या वैभवशाली इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, वाडे आणि सांस्कृतिक स्थळांची माहिती या हेरिटेज वॉकद्वारे तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून देण्यात येणार आहे. शहराच्या समृद्ध इतिहासाचा मागोवा घेताना सहभागी नागरिकांना विविध वास्तूंच्या स्थापत्यकला, ऐतिहासिक घटना आणि सांस्कृतिक महत्त्वाची माहिती समजावून सांगितली जाणार आहे.
या हेरिटेज वॉकमध्ये शिवाजी पूल, घोरपडे घाट, शनिवार वाडा, कसबा गणपती मंदिर, लालमहाल, नानावाडा, भाऊ रंगारी यांचे निवासस्थान, ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिर, दगडूशेठ गणपती मंदिर, भिडे वाडा, नगर वाचन मंदिर, बेलबाग मंदिर, महात्मा फुले मंडई, तुळशीबागवाले राम मंदिर आणि विश्रामबाग वाडा या महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी विविध गटांसाठी स्वतंत्र शुल्क निश्चित करण्यात आले आहे. प्रौढांसाठी 300 रुपये, उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी 200 रुपये, माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी 100 रुपये आणि परदेशी पर्यटकांसाठी 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी नोंदणी आणि अधिक माहिती पुणे महानगरपालिकेच्या हेरिटेज वॉक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच अधिक माहितीसाठी पुणे मनपाचे सल्लागार अजित वामन आपटे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये वारसा संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पुणेकरांनी या हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होऊन शहराच्या वैभवशाली इतिहासाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
Pune,Maharashtra
