7 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘या’ मराठी चित्रपटाने कमावला तब्बल 457 टक्के नफा; महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाचा 2 भाषांमध्ये रिमेक


Marathi entertainment:  सध्या मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करताना दिसत आहेत. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, तर ‘देऊळ बंद 2’ हा 2026 मधील सर्वाधिक नफा कमावणारा मराठी चित्रपट ठरला आहे. दरम्यान मराठी मनोरंजन सृष्टीतील असा एक चित्रपट आहे ज्याने प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातलेला. विशेष म्हणजे या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर मुख्य भूमिकेत होते. तुम्हाला कळलंच असेल हा कोणता चित्रपट आहे ते.. 

‘नटसम्राट’चा होता बॉक्स ऑफिसवर दबदबा

2016 साली प्रदर्शित झालेला ‘नटसम्राट’ हा नाना पाटेकर यांच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट प्रसिद्ध मराठी नाटक ‘नटसम्राट’वर आधारित होता. दमदार कथा, उत्कृष्ट दिग्दर्शन, प्रभावी छायांकन आणि ताकदीच्या अभिनयामुळे चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांचीही मोठी पसंती मिळालेली. प्रेक्षकांनी याचित्रपटाला तुफान गर्दी केली होती. प्रचंड लोकप्रतिसाद मिळालेल्या या चित्रपटाला त्याच्या कमाईवर मोठा परिणाम झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ‘नटसम्राट’ने बॉक्स ऑफिसवर सुमारे 39 कोटी रुपयांची कमाई केली होती.

चित्रपटाची कथा ज्येष्ठ रंगकर्मी गणपतराव बेलवलकर यांच्याभोवती फिरते. रंगभूमीवर ‘नटसम्राट’ म्हणून ओळख मिळवलेल्या या कलाकाराने आयुष्यभर प्रेक्षकांच्या टाळ्या आणि प्रेम मिळवले. मात्र निवृत्तीनंतर त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलते. मुलांमध्ये संपत्ती वाटल्यानंतर त्याला स्वतःच्या कुटुंबाकडूनच उपेक्षा आणि अपमान सहन करावा लागतो. त्यामुळे एकेकाळी रंगमंचावर राज्य करणाऱ्या कलाकाराची भावनिक घुसमट आणि संघर्ष या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.

7 कोटी खर्च, 39 कोटींची कमाई

अवघ्या 7 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 39 कोटी रुपयांचा गल्ला जमवलेला. म्हणजेच चित्रपटाने तब्बल 457.14 टक्के नफा कमावलेला. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘नटसम्राट’चा समावेश होतो. या चित्रपटात नाना पाटेकर यांच्यासोबत मेधा मांजरेकर, विक्रम गोखले, मृण्मयी देशपांडे, सुनील बर्वे आणि अजीत परब यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मितीही नाना पाटेकर यांनीच केली होती.

दोन भाषांमध्ये झाला रिमेक

‘नटसम्राट’च्या यशानंतर या चित्रपटाचा इतर भाषांमध्येही रिमेक करण्यात आला. 2018 मध्ये गुजराती भाषेत याच नावाने चित्रपट प्रदर्शित झाला. तर 2023 मध्ये तेलुगू भाषेत ‘रंगमार्तंड’ (Rangamarthanda) नावाने त्याचा रिमेक तयार करण्यात आला.

नाना पाटेकरांचे आगामी चित्रपट

नाना पाटेकर लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ या बहुचर्चित हिंदी चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. याआधी ते ‘ओ रोमियो’ या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटात शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत दिसले .



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *