मार्केटमध्ये हाहाकार! ‘या’ शेअरची किंमत झाली झिरो; 6.5 लाख गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्के बुडाले, शेअर्स रद्दी झाल्याने भरपाई मिळणार नाही | बिझनेस


Last Updated:

Share Market: अदानी समूहाने ताब्यात घेतलेल्या जयप्रकाश असोसिएट्सचे शेअर्स 18 जूनपासून शेअर बाजारातून कायमचे डिलिस्ट होणार आहेत. कंपनीच्या विद्यमान भागधारकांना कोणतीही भरपाई मिळणार नसल्याने लाखो गुंतवणूकदारांचा पैसा बुडण्याची वेळ आली आहे.

News18
News18

मुंबई: भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लाखो किरकोळ गुंतवणूकदारांसाठी अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) आणि स्टॉक एक्स्चेंजकडून एका मोठ्या कॉर्पोरेट डीलला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर एका नामवंत कंपनीचे शेअर्स बाजारातून कायमचे गायब होणार आहेत.

विशेष म्हणजे या निर्णयामुळे संबंधित कंपनीत कष्टाचा पैसा लावणाऱ्या सर्वसामान्य भागधारकांचे भांडवल आता पूर्णपणे मातीमोल झाले असून त्यांच्या हाती एका पैशाचीही भरपाई पडणार नाही. थेट गुंतवणूकदारांच्या खिशावर दरोडा टाकणारा हा नेमका काय प्रकार आहे आणि कोणत्या कंपनीचे शेअर्स आता ‘रद्दी’ ठरले आहेत ते सविस्तर जाणून घ्या.

अदानी समूहाने खरेदी केलेली जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड (JAL) ही कंपनी आता भारतीय शेअर बाजारातून पूर्णपणे डिलिस्ट होणार आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) कडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता स्टॉक एक्स्चेंजांनीही डिलिस्टिंगला अंतिम मंजुरी दिली आहे.

18 जून 2026 पासून जयप्रकाश असोसिएट्सच्या शेअर्सची शेअर बाजारातील खरेदी-विक्री पूर्णपणे बंद होणार आहे. अदानी समूहाने 14,535 कोटी रुपयांची बोली लावून ही कंपनी ताब्यात घेतली आहे. 17 मार्च रोजी एनसीएलटीच्या इलाहाबाद खंडपीठाने दिवाळखोरी आणि दिवाळखोरी निवारण संहिता (IBC), 2016 च्या कलम 31 अंतर्गत कंपनीच्या रिझोल्यूशन योजनेला मंजुरी दिली होती.

या निर्णयाचा सर्वात मोठा आणि थेट फटका कंपनीचे शेअर्स असलेल्या गुंतवणूकदारांना बसला आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या आकडेवारीनुसार, कंपनीतील 71.23 टक्के हिस्सा सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडे (पब्लिक शेअरहोल्डर्स) आहे. रिझोल्यूशन प्लॅनच्या अटींनुसार जयप्रकाश असोसिएट्सच्या विद्यमान भागधारकांना त्यांच्या शेअर्सच्या बदल्यात कोणतीही रक्कम मिळणार नाही (Zero Consideration). कंपनीची जुनी शेअरहोल्डिंग रचना पूर्णपणे रद्द केली जाणार आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांनी गुंतवलेला पैसा पूर्णपणे बुडाला असून त्यांच्या ताब्यातील शेअर्सची किंमत आता शून्य झाली आहे.

एक्स्चेंजवर शेअर्स विकता येणार नाहीत

18 जून 2026 पासून कंपनी डिलिस्ट झाल्यानंतर गुंतवणूकदारांना हे शेअर्स शेअर बाजारात विकता येणार नाहीत. रिझोल्यूशन प्लॅन मंजूर झाल्यानंतर या शेअरमधील व्यवहार आधीच स्थगित करण्यात आले होते. मात्र आता हा शेअर कायमस्वरूपी बाजारातून हटवला जाणार आहे.

डिलिस्टिंगनंतर एखाद्या गुंतवणूकदाराला आपले शेअर्स विकायचे असल्यास ते केवळ ओव्हर-द-काउंटर (OTC) बाजारातच विकता येतील. याचा अर्थ भागधारकाला स्वतःच खरेदीदार शोधावा लागेल. मात्र कंपनीच्या जुन्या शेअर्सची किंमतच शून्य झाल्याने प्रत्यक्षात या शेअर्ससाठी खरेदीदार मिळणे जवळपास अशक्य मानले जात आहे.

कोणाकडे किती हिस्सेदारी?

NSE च्या 31 मार्च 2026 च्या आकडेवारीनुसार कंपनीमध्ये प्रवर्तक (Promoter) आणि प्रवर्तक समूहाची हिस्सेदारी 28.77 टक्के होती, तर 71.23 टक्के हिस्सा सर्वसामान्य भागधारकांकडे होता. आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीअखेर कंपनीचे एकूण 245.45 कोटींपेक्षा अधिक शेअर्स जारी करण्यात आले होते.

जयप्रकाश असोसिएट्सच्या डिलिस्टिंगमुळे लाखो गुंतवणूकदारांचे भांडवल जवळपास पूर्णपणे नष्ट झाले असून रिझोल्यूशन योजनेनुसार त्यांना कोणतीही भरपाई मिळणार नसल्याने हा निर्णय बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मराठी बातम्या/मनी/

मार्केटमध्ये हाहाकार! ‘या’ शेअरची किंमत झाली झिरो; 6.5 लाख गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्के बुडाले, शेअर्स रद्दी झाल्याने भरपाई मिळणार नाही



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *