Last Updated:
महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला थोड्याच वेळात सुरू होणार आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट फॅन्सच्या नजरा याच सामन्यावर लागल्या आहेत.
एजबॅस्टन : महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला थोड्याच वेळात सुरू होणार आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट फॅन्सच्या नजरा याच सामन्यावर लागल्या आहेत, पण पुन्हा एकदा हँडशेकचा वाद उफाळून आला आहे. टीम इंडिया पाकिस्तानसोबत हँडशेक करणार का नाही? असा प्रश्न टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरला विचारण्यात आला. या प्रश्नावर हरमनप्रीत कौर चांगलीच भडकली.
हरमनप्रीतचं पत्रकाराला प्रत्युत्तर
पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करण्याच्या प्रश्नावर हरमनप्रीतने थेट उत्तर दिलं, पण हा प्रश्न तिला अजिबात आवडला नसल्याचं तिच्या उत्तरावरून दिसलं. मी फक्त क्रिकेटबद्दल बोलणार आहे आणि क्रिकेटबद्दलच्या प्रश्नांचीच उत्तरं देणार आहे. आम्ही इकडे फक्त क्रिकेट खेळायला आलो आहोत. क्रिकेटशिवाय दुसऱ्या कोणत्याही विषयावर बोलणार नाही. मी क्रिकेटशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाहीये, असं हरमनप्रीत कौर म्हणाली.
आशिया कप 2025 पासून नो हँडशेक पॉलिसी
2025 च्या आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळलेल्या टीम इंडियाने नो हँडशेक पॉलिसी स्वीकारली होती. स्पर्धेच्या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हँडशेक केला नव्हता, तसंच ट्रॉफी जिंकल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घ्यायलाही नकार दिला होता. पुढे महिला टीमने वनडे वर्ल्ड कपच्या वेळीही हीच भूमिका कायम ठेवली.
संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार सामना
भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना एजबॅस्टनच्या बर्मिंघममध्ये होणार आहे. संध्याकाळी 7 वाजल्यापासून मॅचला सुरूवात होईल. ‘पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा दबाव नक्कीच असतो. टीम इंडियाला हा दबाव कसा झेलायचा, हे चांगलं माहिती आहे. आम्ही इतर सामन्यांप्रमाणेच या सामन्यातही खेळू आणि आपलं 100 टक्के द्यायचा प्रयत्न करू’, असं वक्तव्य हरमनप्रीत कौरने केलं आहे.
Mumbai,Maharashtra
