T20 Mumbai 2026 Final : जर्सी काढून हवेत फिरवली, LIVE सामन्यात खेळाडू मारायला पळाले; अर्जुन तेंडुलकरच्या टीमसोबत फायनलमध्ये नेमकं काय घडलं?, सगळेच चक्रावले, VIDEO


T20 Mumbai 2026 Final Controversy : टी-20 मुंबई लीग 2026 च्या अंतिम सामन्यात क्रिकेटसोबतच भावना, तणाव, वाद आणि थरार यांचा जबरदस्त संगम पाहायला मिळाला. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या फायनलमध्ये गतविजेता मराठा रॉयल्स आणि ARCS अंधेरी आमनेसामने होते. मात्र सामना संपल्यानंतर सर्वाधिक चर्चा ती मैदानावरील वादाची आणि विजयानंतर जर्सी हवेत फिरवत केलेल्या जल्लोषाची झाली.

शेवटच्या षटकात रंगला थरार, सलग दुसऱ्यांदा मराठा रॉयल्स चॅम्पियन (Maratha Royals Champions 2nd Time)

ARCS अंधेरीला विजयासाठी अखेरच्या षटकात 14 धावांची गरज होती. सामना कोणत्याही बाजूला झुकू शकत होता. पण मराठा रॉयल्सचा गोलंदाज रोहन राजे दबावाखालीही शांत राहिला. त्याने शेवटच्या षटकात केवळ 5 धावा दिल्या आणि आपल्या संघाला 8 धावांनी विजय मिळवून दिला. विजय निश्चित होताच रोहन राजेने आनंदाच्या भरात आपली जर्सी काढून हवेत फिरवत मैदानभर धाव घेतली. त्याचा हा जल्लोष पाहून इतर खेळाडूही त्याच्यात सहभागी झाले. वानखेडे स्टेडियममध्ये एकच जल्लोष उसळला. या विजयासह मराठा रॉयल्सने सलग दुसऱ्यांदा टी-20 मुंबई लीगचे विजेतेपद पटकावले. गतवर्षीचा किताब जिंकणाऱ्या संघाने यंदाही वर्चस्व कायम ठेवत ट्रॉफीवर पुन्हा नाव कोरले.

अर्जुन तेंडुलकरची प्रभावी गोलंदाजी

ARCS अंधेरीकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. त्याने 4 षटकांत 36 धावा देत 2 महत्त्वाचे बळी घेतले. अर्जुनने सचिन मधुकर यादव आणि अयाज खान यांना बाद करत मराठा रॉयल्सला धक्के दिले. तरीही मराठा रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 154 धावा उभारल्या. संघाकडून चिन्मय राजेश सुतार याने 52 चेंडूत 61 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

सामन्यात वाद का पेटला?

ARCS अंधेरीचा डाव सुरू असताना फायनल सामन्याचा तणाव खेळाडूंवर स्पष्टपणे दिसत होता. लक्ष्याचा पाठलाग करताना संघाला निर्णायक क्षणी मोठे धक्के बसले. 17.5 व्या षटकात तुषार देशपांडेने शिवम दुबेचा बळी घेतला, तर 18.3 व्या षटकात इरफान उमैरने गौरव जठारला बाद केले. यानंतर मैदानावर अचानक वातावरण तापले. बाद झाल्यानंतर गौरव आणि तुषार देशपांडे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. काही क्षणांतच हा वाद इतका वाढला की दोघांमध्ये धक्काबुक्कीची परिस्थिती निर्माण झाली. मैदानावरील इतर खेळाडू आणि पंचांनी हस्तक्षेप केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच ARCS अंधेरीचा कर्णधार शिवम दुबे डगआउटमधून धावत मैदानात आला. त्याने गौरव जठारला बाजूला नेत दोघांना वेगळे केले आणि अखेर हा वाद शांत झाला.

फायनलमध्ये सर्व काही पाहायला मिळाले!

या फायनलमध्ये प्रेक्षकांना फक्त क्रिकेटच नाही तर शेवटच्या षटकाचा थरार, खेळाडूंचा आक्रमकपणा, मैदानावरील वाद आणि विजयानंतरचा जल्लोष असे सर्व काही पाहायला मिळाले. मराठा रॉयल्सने पुन्हा एकदा मुंबई क्रिकेटवर आपले वर्चस्व सिद्ध केले.

हे ही वाचा –

Mumbai T20 League 2026 Final: मुंबई लीगच्या फायनलमध्ये राडा; तुषार देशपांडे आणि गौरव जठार भिडले, शिवम दुबेसह सगळे मैदानात धावत आले, नेमकं काय घडलं?, VIDEO





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *