चक्क आईनेही मला ओळखलं नाही..; ‘तुंबाडची मंजुळा’मधील भूमिकेबद्दल मकरंद अनासपुरे यांचा भन्नाट किस्सा – Marathi News | Makarand anaspure reveals his mother reaction on sadhu avtar from tumbadche manjula movie


‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. एकीकडे थिएटरमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे, तर दुसरीकडे यातील भूमिका सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहेत. सध्या सोशल मीडियावर एका गोष्टीची चर्चा रंगली आहे, ती म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या खास विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे मकरंद अनासपुरे यांच्या भूमिकेची. लोकप्रिय अभिनेता मकरंद अनासपुरे पुन्हा एकदा नव्या आणि लक्षवेधी अवतारात प्रेक्षकांसमोर आले आहेत. या चित्रपटात ते एका साधूच्या भूमिकेत असून, त्यांच्या या लूकची सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

चित्रपटातील त्यांच्या गेटअपने पहिल्याच नजरेत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लांब केस, दाट दाढी, कपाळावर ठसठशीत टिळा, गळ्यात माळा आणि अंगावर पारंपरिक वेशभूषा असा साधूचा अवतार या चित्रपटात पाहायला मिळत आहे. साधूची भूमिका असली तरीही त्यांच्या मिश्कीलपणाची आणि खुमासदार अंदाजाची झलक या चित्रपटात दिसून येते. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांची सहजता आणि देहबोलीमुळे या व्यक्तिरेखेला एक वेगळाच रंग मिळाला आहे. मकरंद अनासपुरे यांनी यापूर्वीही विविध छटांतील भूमिका साकारल्या आहेत, मात्र साधूच्या गेटअपमध्ये त्यांचा हा विनोदी अंदाज प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. या कॉमेडी -हॉरर चित्रपटातील त्यांची भूमिका कथेला हलकेफुलके वळण देणारी ठरत आहे.

आपल्या भूमिकेबद्दल मकरंद अनासपुरे म्हणाले, “‘तुंबाडची मंजुळा’ करताना मला एक वेगळाच आणि समृद्ध अनुभव मिळाला. दिग्दर्शक विविध कोरगावकर हा नवीन असला, तरी त्याने हा चित्रपट अत्यंत संवेदनशीलतेने आणि प्रभावीपणे हाताळला आहे. या चित्रपटात मी आजवर कधीही न साकारलेली, थोडी वेगळी अशी ‘भोंदू महाराज’ ही भूमिका साकारली आहे, जी माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होती. या भूमिकेसाठीचा वेगळा लूक तयार करण्यासाठी मेकअपमॅन सचिन गिलबिले आणि कुंदन दिवेकर यांनी खूप मेहनत घेतली असून वेशभूषाकाराने दिलेल्या अनोख्या पेहरावामुळेही माझी भूमिका अधिक उठून दिसते. या लूकचं विशेष म्हणजे चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर माझ्या आईलासुद्धा साधूच्या भूमिकेत मीच आहे हे ओळखता आलं नाही. त्यामुळे हा लूक किती वेगळा आणि प्रभावी झाला आहे, याची मला जाणीव झाली. ही विनोदी भूमिका साकारण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.”

या चित्रपटात जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व रुके, नवोदित अभिनेत्री प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी हे कलाकार आहेत. ऋषिकेश तुरई यांनी या चित्रपटाचे  लेखन केलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विविध कोरगांवकर या दिग्दर्शकाने केलं आहे. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या ५ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *