पुणे: पुण्यातील विमाननगर भागात असलेल्या फिनिक्स मॉलमध्ये शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी एका मोठ्या कार्यक्रमादरम्यान कमालीची अव्यवस्था आणि गोंधळ पाहायला मिळाला. ‘कॉकटेल २’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या संगीत अनावरण (म्युझिक लॉन्च) सोहळ्यासाठी बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर, अभिनेत्री कृती सॅनन आणि रश्मिका मंदाना पुण्यात (Pune News) आले होते. मात्र, चाहत्यांच्या अनियंत्रित गर्दीमुळे या स्टार्सना चक्क धक्काबुक्कीचा सामना करावा लागला, ज्यामुळे कलाकारांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.(Pune News)
Pune News: विनामूल्य प्रवेशामुळे जनसागर उसळला
मँडाँक फिल्म्सच्यावतीने मॉलच्या ‘अव्हेन्यू ऑफ स्टार्स’ या आवारात हा दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी कोणतीही प्रवेशिका किंवा तिकीट ठेवण्यात आले नसल्याने, आपल्या आवडत्या स्टार्सना पाहण्यासाठी पुणेकरांनी मॉलमध्ये अभूतपूर्व गर्दी केली. कलाकार मंचावर येताच चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. परंतु, या उत्साहाचे रूपांतर लवकरच हुल्लडबाजीत झाले. चाहत्यांचे घोळके थेट कलाकारांच्या अंगावर धावून जाऊ लागल्याने मॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. मँडाँक फिल्म्स आणि फिनिक्स मॉल प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका या बड्या कलाकारांना सहन करावा लागला. पुण्यात यापूर्वी कधीही न आलेला अत्यंत वाईट अनुभव आपल्याला आल्याची नाराजी कलाकारांनी बोलून दाखवली.(Pune News)
Pune News: बॅरिकेड्स तोडून थेट स्टेजकडे धाव
कलाकारांना अगदी जवळून पाहण्याच्या नादात अनेकांनी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स ओलांडून थेट स्टेजच्या दिशेने धाव घेतली. अचानक वाढलेल्या या दबावामुळे मॉलची सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. तेथे तैनात असलेले बाऊन्सर्स आणि सुरक्षा रक्षक गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले. या गदारोळात बातमी कव्हर करण्यासाठी आलेले काही व्हिडिओ जर्नलिस्ट आणि छायाचित्रकार (फोटोग्राफर्स) जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच अभिनेता शाहिद कपूरलाही गर्दीतून वाट काढताना धक्काबुक्की झाली. कोणताही मोठा अनर्थ घडू नये म्हणून आयोजकांनी तातडीने पुढील कार्यक्रम रद्द केला आणि सोहळा आटोपता घेतला. कलाकारांना अवघ्या काही मिनिटांतच सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्यामुळे पुढील धोका टळला. मॉल प्रशासनाने कलाकारांच्या येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित मार्ग न ठेवल्यामुळेच ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. दरम्यान, मॉलमध्ये झालेल्या या गर्दीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष