हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! मित्रांसोबत खेळता खेळता बाप-लेक बुडाले, सुन्न करणारा आक्रोश | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

नागपुरच्या कामठी तालुक्यातील महादेव घाटावरील पर्यटनाला गेलेल्या मित्रांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू झाला आहे.

कन्हान नदीत बुडून तिघांचा मृत्यू
कन्हान नदीत बुडून तिघांचा मृत्यू

उदय तिमांडे, प्रतिनिधी, नागपूर : मित्रांसोबत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या तरुणांवर काळाने झडप घातली आहे. नागपूर जवळील कामठी तालुक्यातील कन्हान नदीच्या महादेव घाटावर पर्यटनासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी घडली.

मृतांमध्ये दोन तरुणांसह एका अवघ्या ६ वर्षांच्या चिमुरड्याचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. या भीषण दुर्घटनेमुळे कामठी आणि नागपूरच्या जरीपटका परिसरात शोककळा पसरली आहे.

पर्यटनासाठी मित्रांचा ग्रुप गेला

मिळालेल्या माहितीनुसार, कामठी आणि नागपूर येथील सुमारे १२ ते १३ मित्रांचा गट सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कामठी कँटोन्मेंट परिसरातील महादेव घाटावर पिकनिकसाठी गेला होता. नदीकाठी सर्वजण आनंदात वेळ घालवत होते. याच दरम्यान, या गटातील तिघेजण पाण्याचा अंदाज घेण्यासाठी आणि पोहण्यासाठी कन्हान नदीच्या पात्रात उतरले.

बचावासाठी प्रयत्न केले पण…

नदीत उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही जण प्रवाहासोबत वाहून जाऊ लागले आणि बुडू लागले. हा प्रकार काठावर असलेल्या इतर मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करत तात्काळ त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, नदीच्या पात्रातील पाण्याचा वेग आणि खोली जास्त असल्याने उपस्थितांना त्या तिघांचाही जीव वाचवण्यात अपयश आले.

बाप लेकावर नियतीचा क्रूर घाला 

या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्यांची ओळख पटली असून, रोहित नागदेवे (वय ३३ वर्षे) आणि गौतम अंबादे (वय ३१ वर्षे) या दोन तरुण मित्रांसह गौतम यांचा ६ वर्षांचा निष्पाप मुलगा चैतन्य अंबादे याचाही पाण्यात बुडून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बचाव पथकाने मृतदेह पाण्याबाहेर काढले

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने महादेव घाटाकडे धाव घेतली. प्रशासनाने तात्काळ बचाव पथकाला पाचारण केले. बचाव पथकाच्या जवानांनी नदीपात्रात शोधमोहीम राबवून काही तासांच्या प्रयत्नांनंतर तिघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *