पहिल्यांदाच घडलं… भरभरून, दिलखुलासपणे… मनोज जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, म्हणाले, मी तुमचे मनापासून… – Marathi News | Manoj jarange patil thanks devendra fadnavis over 8 maratha community schemes in maharashtra


संपूर्ण राज्यातील मराठा समाजासाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी 8 योजना सुरू करणार आहे. या योजनांच्या माध्यमातून मराठा समाजाला आता ओबीसी समाजाप्रमाणे अनेक सवलती मिळणार आहेत. याचा फायदा लाखो मराठा बांधवांना होणार आहे. सरकारच्या या घोषणेनंतर आता मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचे आभार मानले आहे. जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

जरांगे पाटलांनी मानले फडणवीस यांचे आभार

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर बोलताना म्हटले की, ’30 मे चे आंदोलन झाल्यापासून राज्य सरकारने जी भूमिका घेतली, ती खरंच चांगली आहे. सरकारला गोरगरीब मराठ्यांची मन जिंकायला येतं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि विशेष करून विखे पाटील साहेबांनी आणि लाड साहेबांनी या सगळ्यांनी मिळून मराठा समाजाच्या जेवढ्या मागण्या आहेत. त्या मागण्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाचा न्याय द्यायचा ठरवलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो.’

पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, ‘आज देखील मुख्यमंत्र्यांनी मराठा आणि कुणबी मंत्रालयासाठी मान्यता दिली, त्याचा सुद्धा प्रोसिडिंग आपल्याकडे त्याचा ड्राफ्ट दिलाय. ओबीसी प्रमाणे सगळ्या सवलती, सारथी मधल्या योजना महामंडळामध्ये योजना, ज्या काही बंद होत्या, त्या सुरू करण्याचा निर्णय आज सरकारने केला. त्याबद्दल सगळ्यांचे आभार. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढला, उदय सामंत यांनी सुद्धा एमआयडीसीचा निर्णय घेतला.’

मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही – जरांगे पाटील

जरांगे पाटलांनी म्हटले की, ‘आता या योजना बंद होऊ देऊ नका यावर तुम्ही बारकाईने लक्ष ठेवा, जे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्याचे सुद्धा आदेश दिले. याचे सुद्धा आभार आम्ही मानतो. 58 लाख नोंदीची यादी आम्ही मागितली, ती सुद्धा सरकार द्यायला तयार आहे. मी मनापासून देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. या मागण्यांना जास्तीत जास्त अंमलबजावणीकडे नेण्याचे काम खरंच विखे पाटील यांनी केलं. नुसत्याच मान्यता द्यायच्या आणि मंजुरी द्यायच्या आणि पुढे काहीच व्हायचं नाही असं करू नका. अशाच पद्धतीने तुम्ही मराठा समाजातील गोरगरीब लेकरांचं कल्याण करा. हा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही.’

मराठा समाजासाठी या योजना सुरू होणार

  • शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना
  • मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना
  • माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना
  • विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर १६ बाबींबाबतची प्रतिपूर्ती करण्याबाबतची योजना
  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी लागू असलेली योजना
  • ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता मराठा समाजातील विद्यार्थी ही पात्र असतील.
  • ओबीसी विद्यार्थ्यांनी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरावर प्रवेश घेतलेल्या इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सवलती लागू करण्यात याव्यात.
  • ज्या शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा इतर मागास प्रवर्गास लागू करण्यात आल्या असतील अथवा भविष्यात लागू करण्यात येतील, त्या सर्व शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजास आपोआप लागू होतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *