Bhiwandi : भिवंडी शहरातील गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेप्रकरणी अखेर निझामपूर महानगरपालिकेच्या तक्रारीवरून बिल्डिंग मालक आणि दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कोणतीही आवश्यक परवानगी न घेता निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचा आरोप बिल्डिंग मालक बिलाल अहमद अबूबकर खान याच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच इमारतीच्या पिलरच्या दुरुस्तीचे काम करणारा कंत्राटदार अशोक यालाही आरोपी करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिल्डिंग मालक आणि कंत्राटदार या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 105, 125 (अ)(ब) तसेच एमआरटीपी कायद्याच्या कलम 52 व 53 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी भिवंडी-निझामपूर महानगरपालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त (अनधिकृत बांधकाम विभाग) फैजल अब्दुल कयूम तातली यांनी फिर्याद दिली आहे.
या भीषण दुर्घटनेत क्रिस कुमार (41), रणजीत सिंग (32), मिरज रसूल शेख (34), संतोष कुमार पांडे (42), शमीम अन्सारी (30), राकेश पासवान (30), अशोक पासवान (42), मुकेश पासवान (35), श्यामजी मुराहु पाल (48) आणि राधेश्याम कमलेश कुशवाह (46) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अभय कुमार यादव (24 ), दीपक कुमार यादव (25) आणि संगीता प्रजापती (36) हे तिघे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून, धोकादायक इमारती, अनधिकृत बांधकामे आणि त्यावरील महापालिकेच्या कारवाईबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास शांतीनगर पोलीस करत आहेत.
नेमकं काय घडलं? (Bhiwandi Building Collapse)
कोहिनूर अपार्टमेंट ही 2007 मध्ये असिसमेंट असून 2012 मध्ये ही इमारत बनवण्यात आली असून या इमारतीमध्ये दोन अपार्टमेंट होते. परंतु कमकुवत काम असल्याने सुरुवातीपासूनच इमारत धोकादायक झाल्याने पालिकेने ही इमारत धोकादायक घोषित केली होती. तर या इमारतीच्या एका विंगच्या तळमजल्यावर काही पिलर नादुरुस्त झाल्याने त्याची दुरुस्ती केली जात असल्याने काल सायंकाळी सहा वाजतापासूनच इमारतीला तडे जाण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे रात्री आठ वाजता इमारत झुकत असल्याने पालिका प्रभाग समिती क्रमांक चारचे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत इमारत खाली करण्यात येत होती. परंतु तळमजल्यावरील दुरुस्ती काम सुरू राहिल्याने व काही कुटुंबातील व्यक्ती साहित्य घेण्यासाठी इमारतीमध्ये गेलेल्या रहिवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. सदर घटनेनंतर इमारतीमधील कुटुंबीयांचा एकच आक्रोश पाहायला मिळाला. (Bhiwandi Building Collapses)
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती