पालघर : मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने (Rain) पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. पालघर, वसई-विरारमध्येही (Vasai) पुन्हा एकदा पावसामुळे हाहाकार उडाला आहे. लोकलसेवा विस्कळीत झाली असून जनजीवनावरही त्याचा परिणामा झाल्याचे दिसून येते. वसई पश्चिमेतील सनसिटी परिसरात गुरुवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी वाहन रस्त्यालगत साचलेल्या पाण्यात घुसली आहे. सनसिटी गास रोडवरील तुळजा मंदिराच्या पुढे काही अंतरावर ही घटना घडली आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ धाव घेतल्याने कारमधील चौघांना वाचविण्यात यश आलं आहे.
येथील रस्त्यावर जाणाऱ्या वाहनाच्या समोर अचानक कुत्रा आल्याने त्याला वाचवण्यासाठी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे वाहन चालकाने म्हटले आहे. कार थेट रस्त्यालगत दोन ते तीन फूट साचलेल्या पाण्यात पडली. सकाळपासून परिसरात पाऊस सुरू असला तरी रस्त्यावर पाणी साचले नव्हते. मात्र, रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते आणि त्यात ही कार पडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने कार पाण्याबाहेर काढण्यात आली. त्यावेळी, वाहनात चार जण प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेचे नेमके कारण पोलिसांकडून तपासले जात असून, कुत्रा समोर आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं असून सूर्या आणि वैतरणा नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झालं आहे. डहाणू तालुक्यातील उर्से साये येथील कॉलनी पाडा पूर्ण पने पाण्याखाली गेला असून येथील सर्व नागरिक आपल घरदार सोडून बाहेर आहेत. तर दहा ते पंधरा नागरिक दाभाडी बेटामध्ये अडकून पडले आहेत. सध्या याठिकाणी एबीपी माझाने मदत कार्य सुरू केलं आहे.
सध्या पालघर परिसरात चक्रीय परिस्थिती निर्माण झाली असून मान्सूनही सक्रिय आहे. त्यामुळे या भागात जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. या हवामान प्रणालीचा परिणाम गुजरातच्या काही भागांवरही होत असून, तेथे पुढील 48 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र, घाटमाथा आणि डोंगराळ भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
एल नीनोचा प्रभाव
दरम्यान, अल्प कालावधीत अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद होत आहे. यामागे अनेक कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामध्ये वातावरणातील बदल, मान्सूनच्या प्रणालींमधील बदल, एल-नीनो/ला-नीना यांसारख्या हवामान घटकांचा प्रभाव तसेच वाढते प्रदूषण यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
ठाण्यातही पावसाची संततधार
ठाणे जिल्हाभरात संततधार पाऊस सुरू असून गेल्या २४ तासांत सरासरी ९२.५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुरबाड तालुक्यात सर्वाधिक १३० मिमी तर ठाणे शहरात १२७ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे शहरात झाडपडीच्या घटना घडल्या असून तानसा व मोडकसागर ही धरणे १००% भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया