नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तारीख आणि ठिकाण निश्चित करण्यात आलं आहे. डब्ल्यूटीसीची फायनल लंडनमधील द ओव्हल मैदानावर खेळवली जाईल. यापूर्वी 2023 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळवली गेली होती. ऑस्ट्रेलियानं भारताला पराभूत करत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं. डब्ल्यूटीसी 2025-27 ची फायनल पुढील वर्षी 9 जून ते 13 जून दरम्यान होईल.
आयसीसीनं गेल्या वर्षी स्पष्ट केलं होतं की पुढील तीन डब्ल्यूटीसी स्पर्धांच्या फायनल इंग्लंडमोद्ये होतील. याचा अर्थ 2027, 2029 आणि 2031 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल इंग्लंडमध्ये खेळवली जाईल. यापूर्वीच्या तीन अंतिम स्पर्धांची फायनल देखील इंग्लंडमध्येच झाली होती.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल 2023 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झाली होती. ऑस्ट्रेलियानं तो सामना 209 धावांनी जिंकला होता. भारत 2021 आणि 2023 मध्ये डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. मात्र, दोन्ही फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता.
WTC च्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानावर?
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये कोणते दोन संघ आमने सामने येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असून दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवर अशलेल्या संघांमध्ये फायनल होते. तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंड आहे. विशेष बाब म्हणजे बांगलादेश चौथ्या स्थानावर असून भारत पाचव्या स्थानावर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन वेळा पोहोचणाऱ्या टीम इंडियाचा मार्ग खडतर असल्याचं पाहायला मिळतंय. भारताला अंतिम सामन्यात पोहोचण्याची आशा कायम ठेवायची असल्यास राहिलेल्या कसोटी सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनं मिळवलं आहे. दरम्यान दोन वेळा अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारताला डब्ल्यूटीसीचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. भारताच्या कसोटी टीममध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली कसोटीतून निवृत्त झाले आहेत. गौतम गंभीर यांच्याकडे प्रशिक्षकपद गेल्यानंतर भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. यामुळं भारताला जागतिक कसोटी अजिंक्य पद स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे. भारत सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. भारताचे अजून 9 कसोटी सामने बाकी आहेत, त्यापैकी 8 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे. मात्र, भारतासाठी हे आव्हान सोपं नाही, कारण न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरोधात त्यांच्या देशात कसेटी सामने खेळायचे आहेत. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामने होतील जे मायदेशात होणार आहेत.