मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका – Marathi News | Manoj Muntashir says CJP protest hijacked by tukde tukde gang Will never go to Jantar Mantar


सीजेपी आंदोलनावर मनोज मुंतशीर यांची प्रतिक्रियाImage Credit source: Instagram

मी कधीच जंतरमंतरवरील या आंदोलनात सहभागी होणार नाही, अशी रोखठोक भूमिका प्रसिद्ध गीतकार आणि लेखक मनोज मुंतशीर यांनी मांडली आहे. नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतल्या जंतर मंतर याठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचं गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या लोकांसोबत मला उभं राहायचं नाही, असं स्पष्ट वक्तव्य मनोज यांनी केलंय. यावेळी त्यांनी हेदेखील स्पष्ट केलं की ते नीट पेपरफुटीचं समर्थन करत नाहीत.

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत मनोज मुंतशीर म्हणाले, “मी जंतर मंतरला जाणार नाही. कारण या आंदोलनाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांसोबत उभं राहणं मला योग्य वाटणार नाही. या देशातील तरुण कॉक्रोच जनता पार्टीपेक्षा अधिक चांगल्या गोष्टीस पात्र आहेत. या जगात नीट पेपरफुटीचं समर्थन कोणीही करणार नाही. जे झालं ते चुकीचंच झालं. जरी एकाचा जीव गेला असेल, तरी संपूर्ण व्यवस्थेला जबाबदार धरावं लागेल. परंतु आता हे आंदोलन त्याच्या मूळ उद्देशापासून भरकटलं आहे. हे सर्व आता अशा लोकांच्या हातात गेलंय, ज्यांच्या विचारसरणीचं मी समर्थन करत नाही. जंतर मंतरवर नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर काही चर्चा होत आहे का? तिथे होणारी भाषणं आणि तिथे येणारे लोक मी पाहतोय.”

यावेळी मनोज मुंतशीर यांनी आरोप केला की ज्या लोकांनी यापूर्वी भारतविरोधी घोषणा दिल्या होत्या किंवा भारतातील काश्मीरच्या स्थानावरून प्रश्न उपस्थित केले होते, ते आता आंदोलनात उपस्थित आहेत. “भारत तेरे टुकडे होंगे.. अशा घोषणा देणारी लोकं तिथे आंदोलनात आहेत. काश्मीर भारताचा भाग नाही.. दावा करणारे तिथे आहेत. मी संपूर्ण जबाबदारीने त्या लोकांना देशद्रोही म्हणतो”, असं ते थेट म्हणाले.

मनोज यांची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी आंदोलनापासून दूर राहण्याच्या त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, तर काहींनी 2023 मधील ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्यावेळी झालेल्या ट्रोलिंगचा उल्लेख केला. ‘हा तोच माणूस आहे, ज्याने ‘जलेगी तेरे बाप की’ आणि असे इतर डायलॉग लिहून रामायणाचा अपमान केला होता. आता ते इतरांना उपदेश देत आहेत’, असं एकाने लिहिलं. तर ‘इतक्या जबाबदारीने तर या व्यक्तीने आदिपुरुषचे संवाद लिहिले होते’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *