डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 


Dombivli Doctor Assault Case News : शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी डोंबिवलीच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी रमेश म्हात्रेसह इतर सर्व आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अशातच रमेश म्हात्रे प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांचीही खरडपट्टी करण्यात आली आहे. आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आल्याची टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. नागरिकांचं संरक्षण करणं पोलिसांकडून अपेक्षित असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

पोलीस आरोपींचं संरक्षण करतात अशी परिस्थिती आम्हाला नको 

पोलीस आरोपींचं संरक्षण करतात अशी परिस्थिती आम्हाला नको आहे. रमेश म्हात्रेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रिमांडसाठी हजर करणाऱ्या ठाणे पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. रिमांड मागण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपीला कोर्टात हजर करण्याची मागणी अतिशय इनोव्हेटिव्ह आहे मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी केली आहे. अधिकारी स्वतःचीच कार्यपद्धती सुरू करू पाहत आहेत का? असा सवाल देखील न्यायालयाने केला आहे. कोण होते ते अधिकारी अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी आम्ही सोमवारच्या सुनावणीत ठाणे पोलीस आयुक्तांनी बोलावू शकतो असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. 

रमेश म्हात्रेला आणखी थोडे दिवस आत राहुदेत, मुंबई उच्च न्यायालयाकडून रमेश म्हात्रेंची कानउघाडणी 

मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेंची देखील कानउघाडणी केली आहे. 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत असलेल्या रमेश म्हात्रेला आणखी, थोडे दिवस आत राहुदे असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. म्हात्रेच्या वयाचा उल्लेख करत अटी शर्थींसह जामीन मागणाऱ्या वकिलांना देखील उच्च न्यायालयाने सवाल केला आहे. व्हिडिओत तुमचं वय 25 असल्यासारखा भास होतोय. महिलांना आणि डॉक्टरांना तुम्ही मारहाण केलीत. 
तुम्ही समाजकार्यात आहात, तुमचं कर्तव्य लोकांची सेवा करणं आहे की त्यांना मारण, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेला केला आहे. एखाद्या वकिलाने वकीलपत्र घेणं टाळलं तर त्याला देखील मारणार का? असा सवाल न्यायालयानं केला आहे.  मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाचे रमेश म्हात्रेला खडेबोल सुनावले आहेत. या प्रकरणी सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

डॉक्टरांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेनंतर तणाव वाढला होता. एका महिला डॉक्टरसह नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा या चौघांवर आरोप आहे. या प्रकरणात डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चौघांना अटक केली. मारहाणीचा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात घडलेल्या या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आधी तिघांना अटक केली. मात्र, विरोधकांनी संताप व्यक्त केल्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रेलाही अटक करण्यात आली.

रमेश म्हात्रेवर हत्येचा प्रयत्न आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल 

डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण करणारे शिंदे गटाचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रे याचा भूतकाळ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ज्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर रमेश सुकऱ्या म्हात्रे (Ramesh Mhatre) याने हल्ला केला आहे, त्याच वैद्यकीय क्षेत्राने म्हात्रेला दोनदा जीवदान दिले होते. होय, तुम्ही बरोबर ऐकताय! हत्येचा प्रयत्न आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेले ‘बाहुबली’ राजकारणी रमेश म्हात्रे याच्यावर 2008 मध्ये जीवघेणा गोळीबार झाला होता. त्या वेळी शर्टच्या खिशातील पेनाने गोळी अडवली, पण ती पोटात घुसली. मृत्यूशी झुंज देत असताना डोंबिवलीच्या एका खाजगी रुग्णालयातील डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून म्हात्रेंचे प्राण वाचवले होते. इतकंच नाही, तर त्याआधी झालेल्या एका हल्ल्यात म्हात्रेची किडनी निकामी झाली असताना, याच डॉक्टरांनी त्यांची एक किडनी काढून त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते. डॉक्टर शिरोडकरांना समोर पाहिल्यावर ‘बाहुबली’ म्हात्रे कृतज्ञतेपोटी थेट पाया पडायचे. मात्र, आज त्याच डॉक्टरांच्या सहकाऱ्यांवर हात उचलल्याच्या घटनेने म्हात्रे तुरुंगाच्या उंबरठ्यावर आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *