विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल – Marathi News | Cm devendra fadnavis slams opposition over delhi student protest neet paper leak


राजधानी दिल्लीत अभिजीत दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. अनेक राजकीय पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टीसह जवळपास सर्वच विरोधकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनावरून विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करावा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर जिल्ह्यात जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांना दिल्लीतील आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, मला वाटते सर्वांनी आपल्या देशाचा विचार केला पाहिजे, देशाची बदनामी होऊ नये याचा विचार केला पाहिजे. पहिल्या दिवसापासून माझे हे मत आहे.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक

पुढे बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, ‘विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणे सरकारचे कर्तव्य आहे. ते आम्ही पूर्ण करू. काही उणिवा राहिल्या असतील तर त्या उणिवा दूर करू. फक्त त्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक, विशेषतः काही राजकीय पक्ष ज्या पद्धतीने कारभार करतात ते काही योग्य नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्याशी आम्ही सहमत आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय केंद्र आणि राज्य सरकार घेईल.

शेतकरी सुखी होऊ दे…

आज मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस आहे, याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आज जन्म दिवसाच्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन घेण्याची संधी मिळणे भाग्याचा क्षण आहे. सगळे वारकरी म्हणजे माऊलींचे रूप आहे. त्याचं सानिध्य मिळणे यामुळे मी खूप आनंदी आहे. माउलीकडे काही मागावं लागत नाही. दरवेळी त्यांना आपल्या मनातील कळते, शेतकरी सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडू दे हे मागणं मागितले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *