Last Updated:
Shabana Azmi: संपूर्ण गदारोळात विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची अचानक प्रकृती बिघडल्याने एकच घबराट पसरली.
दिल्लीत NEET पेपरफुटी घोटाळ्याविरोधात पेटलेला संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी आणि हजारो विद्यार्थ्यांनी २० जुलैला थेट संसदेवर धडक मारली. पावसाळी अधिवेशनामुळे पंतप्रधान मोदींसह संपूर्ण मंत्रिमंडळ संसदेत हजर असताना, बाहेर विद्यार्थ्यांनी एकच गदारोळ घातला.
या जमावाला पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या संपूर्ण गदारोळात विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची अचानक प्रकृती बिघडल्याने एकच घबराट पसरली. पोलिसांच्या अश्रुधुरामुळे त्यांना थेट अस्थमाचा झटका आला होता.
शबाना यांनी सांगितला भयंकर प्रसंग
एका मुलाखतीत या भयानक अनुभवाबद्दल बोलताना ६८ वर्षीय शबाना आझमी म्हणाल्या, “मी आंदोलनस्थळी पोहोचताच पोलिसांनी अश्रुधूर सोडला. त्या धुरामुळे माझा श्वास कोंडू लागला आणि मला अस्थमाचा तीव्र झटका आला. सुदैवाने मी नेहमीप्रमाणे इनहेलर सोबत ठेवला होता, त्यामुळे मी स्वतःला वेळेवर सावरू शकले. तिथल्या काही आंदोलक मुलांनी मला तातडीने एका सुरक्षित ठिकाणी नेले. थोडा आराम केल्यानंतर मी पुन्हा विद्यार्थ्यांमध्ये गेले आणि त्यांचे मनोबल वाढवले. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या या तरुण रक्ताला माझा सलाम आहे.”
शबाना आझमींची रोखठोक भूमिका
आपल्या या सहभागावर स्पष्टीकरण देताना शबाना आझमी यांनी आपण कोणत्याही पक्षाचे समर्थक नसल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, “मला कोणत्या पक्षाचा शिक्का स्वतःवर मारून घ्यायचा नाही. पक्षात गेले की त्यांच्या तालावर नाचावे लागते, पण मला माझा स्वतंत्र आवाज कायम ठेवायचा आहे. NEET ची परीक्षा देणाऱ्या या निष्पाप मुलांच्या मागण्या काही बेकायदेशीर किंवा धोकादायक नाहीत. देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील भोकं बुजवण्यासाठी हे तरुण प्रश्न विचारत आहेत. सरकारने त्यांचा आवाज दाबण्याऐवजी त्यांच्याशी चर्चा करायला हवी.”
Mumbai,Maharashtra
‘त्या धुरामुळे माझा श्वास कोंडला अन्…’, NEET आंदोलनात ज्येष्ठ अभिनेत्रीला आलेला अस्थमा अटॅक, सांगितला भयानक प्रसंग
