भयानक गुन्ह्याने हादरली मुंबई
विश्वास हाच कोणत्याही नात्याचा पाया असतो. पती -पत्नीच्या नात्यात तर प्रेमासोबतच विश्वास खूप महत्वाचा , पण त्यात जर संशयाचा शिरकाव झाला तर क्षणभरात सगळं भस्मसात होऊ शकतं. संशयाच्या भुतामुळेच जोगेश्वरीत नको ते घडलं. आणि एका क्षणात एक संसार उद्ध्वस्त झाला. दुसरं लग्न झाल्यानंतरही आपली पत्नी तिच्या पहिल्या पतीशी मोबाईलवरून संपर्कात असते, त्याच्याशी बोलते असा संशय पतीला आला आणि त्याच रागाच्या भरात तो नको ते करून बसला. पत्नीवरूल संशय आणि संतापामुळे एका इसमाने त्याच्या पत्नीचा गळा आवळून खून केला. मात्र नंतर भानवर आल्यावर आपण काय करून बसलो ते त्याला समजलं, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि त्याच्या उरला तो फक्त पश्चाताप. जोगेश्वरीतील या घटनेमुळे प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. शबरुन नेसा रोजामियाँ अन्सारी असं मृत महिलेचं नाव असून तिच्या हत्येचा आरोपाखाली ओशिवरा पोलिसांनी तिचा पती सेराज अन्सारी( वय 20) याला बेड्य़ा ठोकून अटक केली. सध्या तो गडाईड असून पोलीसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव शबरुन नेसा रोजामियाँ अन्सारी असे असून, जोगेश्वरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील गुलशननगर परिसरातील महाराष्ट्र बेकरीजवळ असलेल्या रोस्वाल्ट इमारतीतील राहत्या घरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबरुन हिचा सेराज अन्सारी याच्यासोबत दुसरा विवाह झाला होता. यापूर्वी तिचा विवाह आरिफ अन्सारी याच्यासोबत झाला होता. मात्र दुसरं लग्न झाल्यानंतरही शबरुन तिच्या पहिल्या पती आरिफशी मोबाईलवरून बोलते, असा संशय सेराज याला होता. याच कारणामुळे सेराज खूप संतापायचा. पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार वाद सुरू होते. या वादाचे रूपांतर अखेर रविवारी हिंसक घटनेत झालं आणि रागाच्या भरात केलेल्या एका कृतीने सगळंच उद्ध्वस्त झालं.
भांडण विकोपाला गेलं आणि..
सोमवारी रात्री शबरुन आणि सेराज यांच्यात याच मुद्यावरून पुन्हा वाद झाला. बघता बघता दोघंही भडकले आणि त्यांचं भांडण अगदी टोकाला गेलं. संतापलेल्या सेरजाने रागाच्या भरात नको ते केलं. त्याने शबरूनचा गळा आवळून तिची हत्या केली. मृत शबरून खाली कोसळली, निपचित पडली. घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. प्राथमिक तपासानंतर सेराज अन्सारी याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये हत्या प्रकरणी गुन्हा नोंदवून अटक केली.
यानंतर पोलिसांनी आरोपी सेराज याला अंधेरी न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्येमागील नेंके कारण, दाम्पत्यामधील पूर्वीचे वाद तसेच इतर बाबींचा ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत.