नवी मुंबई : मासे खाताना घशात अडकलेले माशाचे काटे यशस्वीरीत्या काढण्यात नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारची अनेक प्रकरणं आतापर्यंत दाखल आली आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, माशाचा काटा घशात खोलवर अडकला किंवा मानेतील मऊ ऊतींमध्ये शिरला, तर गंभीर संसर्ग, श्वास घेण्यास त्रास आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशाच दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एका महिला आणि एका पुरुषाने जेवताना चुकून माशाचा काटा गिळला होता. सुरुवातीला दोघांनीही ही किरकोळ समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष केले; मात्र नंतर काटा मानेत खोलवर गेल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली. अशा परिस्थितीत मेडिकव्हर रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने उपचार करून दोघांचेही प्राण वाचवले.
खोपोली येथे राहणाऱ्या 53 वर्षीय रोमा खन्ना (नाव बदललेले आहे), यांनी रात्रीच्या जेवणात मासे खात असताना त्यांनी चुकून माशाचा काटा गिळला. त्यानंतर त्यांच्या घशात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि त्यांना अन्न गिळण्यास त्रास होऊ लागला. हळूहळू त्यांचा त्रास वाढत गेला आणि एका आठवड्याच्या आत त्यांना श्वास घेण्यासही अडचण निर्माण झाली.
नरेश सूरी (नाव बदललेले), वय 60 वर्षे, हे पनवेल येथील शिक्षक आहेत. दुपारच्या जेवणात आवडते मासे खात असताना त्यांनीही चुकून माशाचा काटा गिळला. त्यानंतर त्यांच्या घशात काहीतरी अडकल्याची भावना निर्माण झाली आणि तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांनी प्रथम भाताचा गोळा गिळून आणि त्यानंतर केळे खाऊन काटा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर ते जवळच्या रुग्णालयात गेले, तेथून त्यांना मेडिकव्हर रुग्णालयात पाठविण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारची प्रकरणे आता अधिक प्रमाणात आढळत आहेत. वेळेत योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
मेडिकव्हर रुग्णालयातील ईएनटी आणि एंडोस्कोपिक सर्जन डॉ. राजेंद्र वाघेला म्हणाले, या महिला रुग्ण आमच्याकडे अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झाल्या होत्या. प्राथमिक तपासणीदरम्यान व्हिडिओ लॅरिंगोस्कोपीमध्ये घशाच्या उजव्या बाजूला सूज दिसून आली. मात्र माशाचा काटा दिसत नव्हता. त्यानंतर सीईसीटी (CECT) स्कॅन करण्यात आला. त्यामध्ये काटा घशातून बाहेर पडून मानेच्या आत वरच्या भागात खोलवर अडकल्याचे आढळले. त्या ठिकाणी पू साचून फोडही तयार झाला होता. तपासणीदरम्यान रुग्णाला श्वास घेण्यास अधिक त्रास होऊ लागला आणि त्यांचा रक्तदाबही खूप वाढला. पुढील हृदय तपासणीत त्यांना हृदयविकाराचा झटका (NSTEMI) आल्याचे समोर आले आणि त्यांचे हृदयही व्यवस्थित कार्य करत नव्हते. अँजिओग्राफीमध्ये हृदयाच्या अनेक रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असल्याचे आढळले.
या रुग्णावर उपचार करणे डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होते. रुग्णाच्या हृदयाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रथम अँजिओप्लास्टी करून रक्त पातळ करणारी औषधे देणे आवश्यक होते. मात्र ही औषधे दिल्यास मानेवरील शस्त्रक्रियेदरम्यान जास्त रक्तस्त्राव होण्याचा धोका होता. त्यामुळे रेडिओलॉजिस्ट डॉ. विष्णू पुजारी, कार्डिओलॉजिस्ट डॉ. तमीरुद्दीन दानावडे, भूलतज्ज्ञ डॉ. मेघना चौधरी आणि डॉ. राजेंद्र वाघेला यांनी एकत्रितपणे या परिस्थितीचा सखोल आढावा घेत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
शस्त्रक्रियेदरम्यान मानेमध्ये सूज आणि संसर्ग असल्याने माशाचा काटा शोधणे सोपे नव्हते. त्यामुळे ऑपरेशनदरम्यान अल्ट्रासाऊंड मशीनची मदत घेण्यात आली. अल्ट्रासाऊंडच्या साहाय्याने काट्याचे अचूक स्थान निश्चित करण्यात आले आणि मानेतील हायॉइड हाडाजवळील मऊ ऊतींमध्ये अडकलेला काटा सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. ही संपूर्ण शस्त्रक्रिया सुमारे एका तासात यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
कार्डिओलॉजिस्ट डॉ. तमीरुद्दीन दानावडे म्हणाले, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर होती आणि त्यांच्यावर सतत देखरेख ठेवण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अँजिओप्लास्टी करून हृदयातील दोन रक्तवाहिन्यांवर यशस्वी उपचार करण्यात आले. त्यानंतर रुग्ण पूर्णपणे बऱ्या होऊन घरी परतल्या. हे प्रकरण अत्यंत आव्हानात्मक होते. शस्त्रक्रिया केली नसती तर रुग्णाची श्वासनलिका बंद होण्याचा धोका होता. तसेच गंभीर हृदयविकार असतानाही जनरल अॅनेस्थेशिया देणे धोकादायक होते. विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वयातून हा उपचार यशस्वी होऊ शकला.
डॉक्टरांनी केवळ महिला रुग्णाचाच नव्हे, तर अशाच प्रकारच्या समस्येसह आलेल्या एका पुरुष रुग्णाचाही वेळेत उपचार करून जीव वाचवला.
डॉ. राजेंद्र वाघेला म्हणाले, दुसऱ्या रुग्णाच्या प्राथमिक तपासणीत घशामध्ये सूज होती, मात्र माशाचा काटा दिसत नव्हता. सीटी स्कॅनमध्ये काटा मानेच्या आतील भागात गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जनरल अॅनेस्थेशिया देऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशनदरम्यान अल्ट्रासाऊंडच्या मदतीने काट्याचे अचूक स्थान शोधून तो सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
ते पुढे म्हणाले, मासे खाल्ल्यानंतर बराच वेळ घशात वेदना, सूज किंवा काहीतरी अडकल्याची भावना कायम राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार न घेतल्यास गंभीर संसर्ग किंवा श्वासनलिका बंद होण्यासारख्या जीवघेण्या गुंतागुंती उद्भवू शकतात. अशा वेळी तातडीने ईएनटी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि घरगुती उपाय करण्याऐवजी योग्य वैद्यकीय उपचार घ्यावेत.
डॉक्टरांनी घरगुती उपाय टाळण्याचा सल्लाही दिला. केळे, ब्रेड, कोरडा भात, सोडा किंवा व्हिनेगर पिणे यांसारखे उपाय केल्याने ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. तसेच बोट, चिमटा किंवा इतर कोणत्याही वस्तूने काटा काढण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्यामुळे घशाला गंभीर इजा होऊ शकते. जर माशाचा काटा खोलवर अडकला असेल, तर तो खाली ढकलण्यासाठी जास्त अन्न खाण्याचा प्रयत्न करू नये. श्वास घेण्यास किंवा गिळण्यास त्रास होणे, घसा किंवा छातीत तीव्र वेदना होणे अथवा रक्त येणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळी उपचार मिळाल्यास अनेक वेळा शस्त्रक्रियेविना देखील काटा काढणे शक्य होते.
मेडिकव्हर रुग्णालयाचे महाराष्ट्र आणि कर्नाटक विभागाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल म्हणाले, माशाचा अगदी छोटासा काटाही गंभीर वैद्यकीय गुंतागुंत निर्माण करू शकतो. अशा वेळी वेळेवर उपचार आणि अनुभवी डॉक्टरांची टीम रुग्णाचा जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
मेडिकव्हर रुग्णालयाचे सेंटर हेड संदीप जोशी म्हणाले, या दोन्ही रुग्णांवरील यशस्वी उपचार हे आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या उत्तम समन्वयाचे आणि आधुनिक वैद्यकीय उपचारपद्धतीचे उत्तम उदाहरण ठरले आहे. सर्व तज्ज्ञांनी एकत्रितपणे सुरक्षित आणि प्रभावी उपचार करून दोन्ही रुग्णांना पूर्णपणे बरे केले.
– मेडिकव्हर रुग्णालयातील ईएनटी आणि एंडोस्कोपिक सर्जन डॉ. राजेंद्र वाघेला
– मेडिकव्हर रुग्णालयाचे सेंटर हेड संदीप जोशी
– कार्डिओलॉजिस्ट डॉ. तमीरुद्दीन दानावडे
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Child Health: शाळा, प्रवासात टाईप – 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात…
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator