Ashadhi Ekadashi 2026: भगवान विठ्ठल…ज्यांना भाविक विठोबा, पांडुरंग, विठुराया असेही म्हणतात. भगवान विठ्ठल हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहेत. धार्मिक श्रद्धेनुसार विठ्ठल हे भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण यांचेच रूप मानले जाते. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या तीरावर असलेले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे त्यांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. वारकरी संप्रदायासाठी सर्वात महत्त्वाचा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. वैदिक पंचांगानुसार, ही एकादशी 25 जुलै रोजी येत आहे, यानिमित्त लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला वारी करतात, भगवान विठ्ठलांचे दर्शन घेतात, यावेळी मात्र अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे, विठुरायाच्या कानात माशाच्या आकाराचे कुंडल का आहेत? आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आज आपण याचे धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा जाणून घेणार आहोत, जी फार कमी लोकांना माहित आहे…
भगवान विठ्ठलांचे स्वरूप हिंदू धर्मात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण….(Ashadhi Ekadashi 2026 Lord Vitthal)
हिंदू धर्मात भगवान विठ्ठलांचे स्वरूप अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. विठ्ठल एका विटेवर उभे आहेत. ठ्ठलांची सर्वात वेगळी ओळख म्हणजे दोन्ही हात कंबरेवर ठेवलेली मुद्रा… पंढरपूरातील विठ्ठलाची मूर्ती काळ्या दगडाची असून तिचे तेजस्वी आणि प्रसन्न स्वरूप भक्तांना आकर्षित करते. डोक्यावर सुंदर मुकुट आहे. कानात माशाच्या आकाराची कुंडले आहेत, जी विष्णूच्या पारंपरिक अलंकारांपैकी एक मानली जातात. गळ्यात हार, वैजयंतीमाला आणि इतर दागिने आहेत, अनेक शास्त्रीय वर्णनांमध्ये विठ्ठलाच्या वक्षस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह आणि कौस्तुभमणीचा उल्लेख आढळतो. त्यापैकी एक म्हणजे भगवान विठ्ठलाच्या मूर्तीच्या कानात दिसणारे दागिने अनेकदा माशाच्या आकाराचे वाटतात. मात्र यामागील धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा जाणून घेऊया…
भगवान विठ्ठलाच्या कानात माशाच्या आकाराचे कुंडल का आहेत?
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विठ्ठलाच्या कानात माशाच्या आकाराची कुंडले आहेत, जी विष्णूच्या पारंपरिक अलंकारांपैकी एक मानली जातात. धार्मिक शिल्पकलेनुसार त्यांना ‘मकरकुंडल’ (माशाच्या आकाराची कुंडले) असे म्हटले जाते.. ‘मकर’ हा हिंदू पुराणांतील एक पौराणिक जलचर प्राणी आहे. काही कलाशैलींमध्ये त्याचे रूप मासा, मगर आणि इतर जलचरांच्या मिश्र स्वरूपात दाखवले जाते. त्यामुळे सामान्य भक्तांना ही कुंडले माशाच्या आकाराची वाटू शकतात.
भगवान विठ्ठलाच्या कानात मकरकुंडले हे कशाचं प्रतीक आहे?
- भगवान विष्णूच्या अनेक मूर्तींप्रमाणेच विठ्ठलालाही विष्णूचे स्वरूप मानले जाते.
- मकरकुंडले ही दैवी तेज, संरक्षण आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानली जातात.
- जलतत्त्वाशी संबंधित असल्यामुळे ती सृष्टी, जीवन आणि समृद्धीचेही प्रतीक मानली जातात.
- प्राचीन भारतीय शिल्पकला आणि मंदिर परंपरेत विष्णू, कृष्ण आणि इतर अनेक देवतांना मकरकुंडले घातलेली दाखवण्याची परंपरा आहे.
मकर कुंडले म्हणजे काय?
भगवान विठ्ठलाच्या मकरकुंडलांची रचना काही मूर्तींमध्ये माशासारखी दिसते. त्यामुळे लोक त्यांना “माशाचे कानातले” म्हणतात. परंतु धर्मशास्त्रीय आणि शिल्पकलेच्या दृष्टीने त्यांचे योग्य नाव मकरकुंडल हेच आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, पंढरपूरचे विठ्ठल हे भगवान विष्णूंचे रूप असल्याने त्यांच्या कानातील मकरकुंडले ही विष्णूच्या पारंपरिक अलंकारांचा अविभाज्य भाग मानली जातात.
भगवान विठ्ठलांना मकरकुंडल दागिना इतका प्रिय का आहे? पौराणिक कथा जाणून घ्या…
“मकर कुंडले” म्हणजे माशाच्या आकाराचे कानातले किंवा दागिना. भगवान विठ्ठलाची मकर कुंडले (माशाच्या आकाराचे कानातले) घालण्यामागे एक सुंदर कथा आहे. ही कथा भक्त आणि देव यांच्यातील अतूट प्रेम आणि भक्तीचा संगम दर्शवते. ही कथा आपल्याला शिकवते की देव जात किंवा वर्गाचा विचार न करता प्रत्येक भक्ताची भक्ती स्वीकारतो. आपण नेहमी देवाशी भक्तीपूर्ण राहिले पाहिजे आणि त्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पौराणिक कथेनुसार जाणून घ्या की पांडुरंगांच्या कानात मासे का आहेत.
एक गरीब कोळी होता जो भगवान विठ्ठलाचा मोठा भक्त होता. एके दिवशी, तो देवाला आपला मासा अर्पण करण्यासाठी मंदिरात गेला, परंतु मंदिरातील पुजारी आणि उच्च जातीच्या लोकांनी त्याला थांबवले, कारण तो कोळी होता आणि देवाला मासे अर्पण करणे योग्य मानले जात नव्हते. तो कोळी बाहेर निराश होऊन उभा होता आणि त्याने देवाला प्रार्थना केली की, त्यांनी त्याच्यासमोर प्रकट होऊन त्याचे अर्पण स्वीकारावे. त्या कोळ्याची भक्ती आणि प्रेम पाहून भगवान विठ्ठल मंदिरातून बाहेर प्रकट झाले आणि त्यांनी त्याला विचारले की त्याला काय हवे आहे. कोळ्याने आपली अडचण सांगितली आणि म्हणाला की त्याला आपला मासा देवाला अर्पण करायचा आहे. त्या कोळ्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन, भगवान विठ्ठलांनी त्याचा मासा आपल्या कानांत कर्णभूषण म्हणून घातला. या घटनेनंतर, भगवान विठ्ठल मकर-कुंडले धारण केलेले दाखवले जातात, जे भक्त आणि देव यांच्यातील प्रेम आणि समानतेचे प्रतीक आहे.
हेही वाचा :
Hindu Religion: कोण आहेत ‘ते’ 7 चिंरजीवी..जे कलियुगात आजही जिवंत? ते आज कुठे आहेत? भगवान कल्किचे सैन्य बनतील? धर्म, शास्त्रातील वर्णन जाणून थक्क व्हाल
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)