मुंबई : देशाची राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाची (Agitation) धग आता देशभर पसरली असून विरोधातील राजकीय पक्षांनी थेट सहभाग घेतल्याचं दिसून येत आहे. दिल्ली पोलिसांकडून झालेल्या मारहाणीनंतर देशभरातील जनता केंद्रातील मोदी सरकारवर संतप्त झाली असून राजकीय पक्षाचे नेतेही दिल्लीत पोहोचत आहेत. ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्या दिल्लीत जाणार आहेत. तर, वंचित बहुजन आघाडीकडून (VBA) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय. दुसरीकडे दिल्लीत आंदोलनाला पाठिंबा वाढत असून जंतरमंतरसह पावसाळी अधिवेशनातही आंदोलनाचे पडसाद दिसत आहेत.
दिल्लीत जंतर मंतर आणि संसद परिसरात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’ने 23 जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मी सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी एकत्र येऊन 23 जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा द्यावा, असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे, दिल्लीतील आंदोलन आणि विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीवरून आता महाराष्ट्राच्या गल्लीतही बंदचा संताप पाहायला मिळेल.
दिल्लीत नीट पेपर फुटीप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाला आता प्रमुख राजकीय विरोधकांचं बळ मिळत आहे. एकीकडे राहुल गांधी त्यांच्या खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी धडकले आहेत तर त्याचवेळी शरद पवार हेदेखील विद्यार्थ्यांसाठी मैदानात आले आहेत. शरद पवार हे दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी आंदोलकांशी चर्चा करत त्यांच्याकडून माहिती घेतली. शरद पवारांनी अभिजीत दिपके यांच्याशी चर्चा करत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीवर देखील चिंता व्यक्त केली.
अहिल्यानगरमध्ये आंबेडकरी कार्यकर्ते रस्त्यावर
दिल्लीच्या जंतर-मंतर येथील आंदोलनाला अहिल्यानगरच्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. रिमझिम पावसातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध आंबेडकरी संघटनांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले. ‘मोदी हटाव देश बचाव’, ‘हम क्या चाहते आझादी’, ‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या’ अशा जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दुमदुमून सोडला. यावेळी दिल्ली येथील लाठीचार्जचा निषेध करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
हेही वाचा
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं