नवी दिल्ली : नीट पेपर फुटीप्रकरणी नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला आता विरोधकांचं राजकीय बळ मिळताना दिसत आहे. एकीकडे राहुल गांधी हे त्यांच्या खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी धडकले आहेत तर त्याचवेळी शरद पवार (Sharad Pawar) हेदेखील विद्यार्थ्यांसाठी मैदानात आले आहेत. शरद पवार हे दिल्लीतील जंतर मंतर (Delhi Jantar Mantar Protest) मैदानावर पोहोचले आहेत. यावेळी शरद यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांच्याकडून माहिती घेतली. शरद पवारांनी यावेळी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीवर चिंता व्यक्त केल्याचं दिसून आलं.
शरद पवारांनी अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांच्याशी चर्चा केली. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर कसे अत्याचार केले, त्यांना कसे मारहाण केलं याची माहिती दिली. खासगी कंपनीमध्ये एखाद्याला एक-दोन चुका केल्यानंतर कामावरुन काढून टाकलं जातं, इथे मात्र पेपर लीक होऊनसुद्धा, लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात जाऊनसुद्धा शिक्षण मंत्र्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, अशी तक्रार अभिजीत दिपके यांनी यावेळी शरद पवारांकडे केली.
Rahul Gandhi Protest : पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा
दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनात झालेल्या लाठीचार्जनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याचसंदर्भात राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि परीक्षा फुटीवर चर्चेची मागणी केली. मात्र चर्चेआधी सरकारशी बोलावं लागेल असं अध्यक्ष म्हणाल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. त्यावरून राहुल गांधींनी संताप व्यक्त केला.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच हवा, मात्र विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाचे आदेश देणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी राम मनोहर लोहिया रूग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. दिल्लीत संसद भवनावरील मोर्चाच्या वेळी झालेल्या लाठीमारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची त्यांनी विचारपूस केली. तर केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी देखील राम मनोहर रूग्णालयात जाऊन जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यानंतर रूग्णालयातील डॉक्टरांसोबत आपत्कालीन बैठक घेतली.
ही बातमी वाचा:
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं