NEET: मुलाचा पाठ मोडेपर्यंत अभ्यास, उत्तरपत्रिकेत ५२२ गुण पण निकाल वेगळाच, बाप ढसाढसा रडला | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Beed Student NEET UG 2026 Result Row: राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. बीडमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेनुसार अपेक्षित गुण आणि स्कोअर कार्डवरील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचे सांगितले जाते.

नीट परीक्षा निकालात घोळ
नीट परीक्षा निकालात घोळ

सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड : ‘नीट यूजी २०२६’चा निकाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बीडमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेनुसार अपेक्षित गुण आणि स्कोअर कार्डवरील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप केला आहे. बीडच्या सोहम गवते या विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेनुसार ५२२ गुण अपेक्षित असताना स्कोअर कार्डवर अवघे ९५ गुण आले आहेत. त्यामुळे सोहम या निकालावर आक्षेप घेतला आहे.

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. या निकालात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली. विशेषत: मराठवाड्यातील तरुणांचा निकाल अतिशय चांगला लागलेला दिसून येत आहे. दुसरीकडे काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आणि प्रत्यक्ष निकालात मोठी तफावत जाणवते आहे.

गरिबांच्या पोरांनी अभ्यास करायचा की नाही, पालक संतप्त

बीडचे गवते कुटुंब अनपेक्षित निकालामुळे धक्क्यामध्ये आहे. एवढी मेहनत घेऊनही नीट परीक्षेमधील गोंधळ आमच्या विद्यार्थ्यांचे भविष्य खराब करेल या भीतीने सोहमच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. तर सोहम धक्क्यामध्ये होता, त्याला कसं सावरलं हे आम्हाला माहित, असे सोहमच्या आईने सांगितले.

या तफावतीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी असून, निकालात दुरूस्ती न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) काय स्पष्टीकरण येते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. ‘नीट’ निकालातील त्रुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला असून, एनटीएने याची तातडीने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

नीट पेपरफुटीचा केंद्रबिंदू महाराष्ट्र

गत महिन्यात नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने देशभरात गोंधळ उडाला. काही लाखांसाठी लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आले. सीबीआय तपासात महाराष्ट्र पेपरफुटीचे केंद्र असल्याचे समोर आले. पुण्यातील एक वरिष्ठ प्राध्यापक, एक महिला आणि लातूरमधील दोन प्राध्यापकांना पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने अटक केली. त्यांच्या घराकडून पेपरफुटीतले काही महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. एकेकाळी लातूर पॅटर्न गवगवा संपूर्ण देशात होत होता, त्याच लातुरात आरसीसी क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर याने आपल्या मुलासाठी पेपर फोडल्याचा संशय सीबीआयला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *