हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित
मुंबई इंडियन्स 8 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर राहिला. आता, हार्दिक पांड्याने कर्णधारपद सोडल्याच्या मुद्द्यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे आणि साखळीतील शेवटच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड यांनी या संदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केले. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर, मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक कायरोन पोलार्ड यांनी पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाबद्दलच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
पॉलार्ड म्हणाले की, “कर्णधार म्हणून हार्दिकने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. व्यवस्थापनाला जशी आशा होती तसे झाले नाही. हे स्पष्ट आहे की, कर्णधार म्हणून यशस्वी होण्यासाठी आम्ही त्याला प्रत्येक संधी देण्याचा प्रयत्न केला. 14 सामन्यांतील 10 पराभवांसाठी तुम्ही केवळ एका खेळाडूला दोष देऊ शकत नाही; हा आपल्या सर्वांसाठी एक धडा आहे. आम्ही सर्वांनी प्रयत्न केला, पण गोष्टी आमच्या मनासारख्या घडल्या नाहीत.”
मुंबई इंडियन्सचा आयपीएल 2026 चा हंगाम साखळी टप्प्यातच संपल्यानंतर, पुढील वर्षीच्या हंगामापूर्वी मोठे बदल अपेक्षित आहेत, ज्यात संघातून काही खेळाडूंना वगळण्याची शक्यता आहे. पोलार्ड यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले, “आता सुधारणा करण्याची वेळ आहे आणि पुढील हंगामासाठी संघाला सर्वोत्तम काय अनुकूल ठरेल यावर चर्चा करण्यासाठी आम्हाला एकत्र बसण्याची गरज आहे. आम्ही यात घाई करू शकत नाही; आम्हाला प्रत्येकाला थोडा वेळ द्यायचा आहे, कारण ही भावनिक निर्णय घेण्याची वेळ नाही.”
मुंबईने या हंगामात 14 पैकी फक्त चार सामने जिंकले, उर्वरित दहा सामन्यात त्यांना पराभवाचा फटका बसला आहे. या हंगामात मुंबईची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभाग अपयशी ठरले. मुंबईने या हंगामात अनेक बदल केलेले पाहायला मिळाले पण विजयी होण्यात अपयशीच ठरले. मुंबईने या हंगामात अनेक युवा खेळाडूंना पदार्पणची संधी ही दिली ही पण तेही विशेष काहीच करु शकले नाही. आता मुंबई इंडियन्स पुढील हंगामासाठी काय बदल करते याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
