Spain vs Argentina: फायनलसाठी वादग्रस्त रेफरीची नियुक्ती, मॅचआधी सर्वात मोठा राडा; मेस्सीला दिला होता घाव, 6 वर्षांपूर्वी काय झालं होतं? | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

FIFA World Cup Final: फिफा विश्वचषक फायनलमध्ये स्पेन आणि अर्जेंटिना हे दोन संघ एकमेकांविरुद्ध असतील. या हाय व्होल्टेज सामन्यात स्लोव्हेनियाचे पंच स्लाव्हको व्हिनिक यांची मुख्य पंच म्हणून नियुक्ती केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

News18
News18

फुटबॉल जगतातील सर्वात मोठी आणि बहुप्रतिक्षित लढत म्हणजेच फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. रविवारच्या या ऐतिहासिक महामुकाबल्यात स्पेन आणि अर्जेंटिना हे दोन दिग्गज संघ आमनेसामने असतील. लियॉनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यात मेस्सीच्या खेळासोबतच आणखी एका व्यक्तीवर जगाची नजर असणार आहे, ती म्हणजे सामन्याचे मुख्य पंच स्लाव्हको व्हिनिक होय.

फिफाने रविवारी मेटलाईफ स्टेडियमवर होणाऱ्या या महाअंतिम सामन्यासाठी स्लोव्हेनियाचे अनुभवी पंच स्लाव्हको व्हिनिक यांची मुख्य पंच म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या सोबतीला त्यांचेच देशवासीय तोमाझ क्लॅन्कनिक आणि आंद्राझ कोव्हाकिक हे सहाय्यक पंच म्हणून काम पाहतील तर जॉर्डनचे अधम मखादमे हे चौथे अधिकारी असतील. मात्र या नियुक्तीनंतर फुटबॉल वर्तुळात पुन्हा एकदा एक जुना वाद उफाळून आला आहे. अवघ्या 6 वर्षांपूर्वी व्हिनिक यांना सेक्स पार्टी आणि ड्रग्स रॅकेटवरील छाप्यात अटक करण्यात आली होती.

काय होतं 2020 मधील ‘ते’ वादग्रस्त प्रकरण?

मे 2020 मध्ये बोस्निया आणि हर्जेगोव्हिना येथील एका फार्महाऊसवर पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. एका हायप्रोफाइल सेक्स आणि ड्रग्स पार्टीवर टाकलेल्या या छाप्यात स्लाव्हको व्हिनिक यांना पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले होते.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी तिजाना माक्सिमोविच नावाच्या महिलेला अटक केली होती. जी आंतरराष्ट्रीय स्तरावर वेश्याव्यवसाय रॅकेट चालवणारी मुख्य सुसूत्रधार मानली जात होती. पुढील वर्षी तिजानाने आंतरराष्ट्रीय स्तरावर वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन दिल्याचा गुन्हा न्यायालयात कबूल केला. ज्यासाठी तिला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

या छाप्यादरम्यान पोलिसांनी 26 पुरुष आणि 9 महिलांना ताब्यात घेतले होते. तसेच घटनास्थळावरून कोकेनचे 4 पाकिटे, 10 पिस्तूल, 3 बुलेटप्रूफ जॅकेट आणि 10,000 युरोपेक्षा जास्त रोख रक्कम जप्त केली होती. या मोठ्या गुन्हेगारी टोळीच्या कचाट्यात फिफाचे हे नामवंत पंच सापडल्याने संपूर्ण क्रीडा जगताला मोठा धक्का बसला होता.

ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक

या संपूर्ण प्रकरणात व्हिनिक यांच्यावर थेट गुन्हेगारीचा आरोप नव्हता. पोलिसांनी त्यांची केवळ एक साक्षीदार म्हणून चौकशी केली आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. स्लोव्हेनियाच्या स्थानिक वृत्तवाहिनी ‘व्हेचेर’शी बोलताना व्हिनिक यांनी आपली बाजू मांडली होती.

मी त्या फार्महाऊसवर अगदी अपघाताने पोहोचलो होतो. माझी स्वतःची कंपनी आहे आणि मी एका बिझनेस मीटिंगसाठी बोस्नियात गेलो होतो. तिथे मला एका बिझनेस लंचचे (जेवणाचे) आमंत्रण मिळाले, जे स्वीकारणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. मी माझ्या सहकाऱ्यांसोबत टेबलावर बसलो होतो आणि अचानक तिथे पोलीस आले. अटक झालेल्या टोळीशी किंवा माझ्या बिझनेस पार्टनरशी माझा काहीही संबंध नव्हता. आम्हाला पोलिसांनी चौकशीसाठी नेले होते. पण आमचा त्या लोकांशी काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्यावर आम्हाला सोडून देण्यात आले, असे व्हिनिक यांनी म्हटले होते.

फुटबॉल असोसिएशनकडून पाठिंबा

त्यावेळी स्लोव्हेनियाच्या फुटबॉल पंचांच्या संघटनेचे अध्यक्ष व्लाडो शाईन यांनी व्हिनिक यांची पाठराखण केली होती. अधिकृत आणि अनधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हिनिक यांच्यावर कोणताही संशय नाही किंवा त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई सुरू नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. ते चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी गेले होते आणि ती केवळ एक दुर्दैवी घटना होती, असे म्हणत असोसिएशनने त्यांना क्लिन चिट दिली होती.

मेस्सीसोबतचा जुना हिशोब आणि व्हिनिक यांचा ट्रॅक रेकॉर्ड

स्लाव्हको व्हिनिक हे फुटबॉल जगतातील अत्यंत प्रतिष्ठित पंच मानले जातात. त्यांनी 2024 ची चॅम्पियन्स लीग फायनल (रिएल माद्रिद विरुद्ध बोरुसिया डॉर्टमुंड) यशस्वीपणे हाताळली होती.

विशेष म्हणजे मेस्सी आणि अर्जेंटिना संघासोबत व्हिनिक यांचा अनुभव फारसा चांगला राहिलेला नाही. 2022 च्या विश्वचषकात जेव्हा सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला पराभूत करून जगात सर्वात मोठा उलटफेर केला होता, त्या सामन्यात व्हिनिक हेच मुख्य पंच होते. या चालू हंगामात त्यांनी मेक्सिको विरुद्ध इक्वाडोर, ब्राझील विरुद्ध मोरोक्को आणि अल्जेरिया विरुद्ध जॉर्डन अशा तीन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये पंचांची भूमिका चोख बजावली आहे.

आता रविवारी होणाऱ्या महामुकाबल्यात जिथे आधीच पंचांवर पक्षपातीपणाचे आरोप होत आहेत तिथे व्हिनिक हा हाय-व्होल्टेज सामना कसा हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

Spain vs Argentina: फायनलसाठी वादग्रस्त रेफरीची नियुक्ती, मॅचआधी सर्वात मोठा राडा; मेस्सीला दिला होता घाव, 6 वर्षांपूर्वी काय झालं होतं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *