बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा


परभणी: जिल्ह्यातील नागरिकांच्या मनाला चटका देणारी दुर्घटना (Accident) घडली असून पाथरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गुंज येथील दत्तसंप्रदायाचे ज्येष्ठ संत कालिदास महाराज यांचे आज पहाटे छत्रपती संभाजीनगर येथील बीड (Beed) बायपास परिसरात झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने परभणीसह (Parbhani) मराठवाडाभरातील भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, श्रीक्षेत्र गुंज येथे शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, टेंबे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे दर्शनासाठी गेलेले कालिदास महाराज आपल्या सहकाऱ्यांसह गुंजकडे परत येत होते. यावेळी बीड बायपास परिसरात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कालिदास महाराज यांच्यासह त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कालिदास महाराज यांनी गेली चार दशके अखंड मौनव्रताचे पालन करत अध्यात्म, सेवा आणि समाजप्रबोधनाचा अनोखा मार्ग स्वीकारला होता. दत्त संप्रदायाच्या विचारांचा प्रसार करत त्यांनी राज्यभर असंख्य भक्तांना आध्यात्मिक जीवनाची दिशा दिली. व्यसनमुक्ती, सदाचार, निस्वार्थ सेवा आणि लोककल्याण यांचा संदेश त्यांनी आपल्या आचरणातून दिल्याने त्यांच्याबद्दल समाजात विशेष आदराची भावना होती.

भाविकांवर शोककळा, मंत्र्यांकडून श्रद्धांजली

मौनव्रत असूनही त्यांच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक श्रीक्षेत्र गुंज येथे येत असत. त्यांच्या आशीर्वादातून आणि साध्या, संयमी जीवनातून अनेकांना अध्यात्माची प्रेरणा मिळाली. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच भाविकांमध्ये दुःखाची लाट पसरली असून, सामाजिक, धार्मिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. तर, मंत्री मेघना बोर्डीकर यांनीही महाराजांना श्रद्धांजली वाहिली. श्री क्षेत्र गुंज येथील परमपूज्य कालिदास महाराज यांच्या छत्रपती संभाजीनगरजवळ झालेल्या दुर्दैवी अपघाती निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. समाजाला अध्यात्म, संस्कार आणि मानवतेची शिकवण त्यांनी सदैव दिली. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन, अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियातून केलीय. 

बीडकडे जाणाऱ्या बसने अचानक घेतला पेट

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती संभाजीनगरहून बीडच्या दिशेने जाणाऱ्या ईव्ही बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली, राष्ट्रीय महामार्गावरील सांजखेडा शिवारात हा अपघात झाला. बसच्या मागील बाजूने धूर निघत असल्याचे शेजारून जाणाऱ्या वाहनचालकाच्या लक्षात आले. त्याने बसचालकाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर चालकाने तातडीने बस रस्त्याच्या कडेला थांबवून बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र, ईव्ही बसला नेमक्या कोणत्या कारणामुळे आग लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जळगावमध्येही अपघात, 2 ठार

जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडेगाव शिवाराजवळ जामनेरहून जळगावकडे येणाऱ्या भरधाव कारचा जळगाव विमानतळ ते गाडेगाव दरम्यान भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार डिवाइडरला धडकून पलटी झाली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

हेही वाचा

धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *