FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द


मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारवाईचा धडाका सुरुच आहे. मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि तितक्याच प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर एफडीए ने करावाई केली आहे. गंभीर स्वच्छता व अन्नसुरक्षा त्रुटी डेअरीमध्ये आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. 

मुंबईतील PARSI DAIRY FARM PVT. LTD., प्रिन्सेस स्ट्रीट, मरीन लाईन्स, कालबादेवी येथील आस्थापनेवर केलेल्या तपासणीत अन्नसुरक्षा व स्वच्छतेसंदर्भातील अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने संबंधित आस्थापनेचा FSSAI परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. दिनांक 14 जुलै 2026 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केलेल्या तपासणीत अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 तसेच अन्न व्यवसाय परवाना व नोंदणी नियम, 2011 मधील विविध तरतुदींचे गंभीर उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. तपासणीनंतर सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त (अन्न), परिमंडळ-1 यांनी दिनांक 15 जुलै 2026 रोजी परवाना निलंबनाचा आदेश जारी केला.

तपासणीदरम्यान आढळलेल्या प्रमुख त्रुटींमध्ये कच्च्या दुधाच्या स्वीकारासाठी संरक्षित Raw Milk Reception Dock नसणे, साठवण कक्ष व उत्पादन विभागातील भिंतींवर बुरशीची वाढ, कच्चा माल थेट जमिनीवर साठविणे, बुरशीग्रस्त भिंतीलगत कच्चा माल ठेवणे, उत्पादन विभागात अस्वच्छता, माशांचा मोठ्या प्रमाणात वावर, कीटक व उंदीर प्रतिबंधक जाळ्यांचा अभाव, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा (ETP) नसणे, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदी अपूर्ण असणे, योग्य सुरक्षात्मक पादत्राणे उपलब्ध नसणे, वाहन स्वच्छतेच्या नोंदी उपलब्ध नसणे तसेच अनेक अन्नपदार्थांवर ‘Best Before/Use By/Date of Expiry’ यांसारखी अनिवार्य माहिती नसणे अशा गंभीर बाबींचा समावेश आहे.

ग्राहकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता

या त्रुटींमुळे अन्नाचे सूक्ष्मजीवजन्य दूषितीकरण होण्याचा तसेच ग्राहकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. त्यामुळे व्यापक जनहित व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने संबंधित आरथापनेचा परवाना क्रमांक ११५१७००१०००२५४ हा १५ जुलै २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. निलंबन कालावधीत संबंधित आस्थापनेला अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री किंवा वितरण करण्यास मनाई करण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

1916 मध्ये स्थापन झालेले मुंबईतील जुने पारशी डेअरी फार्म

मुंबईतील मरीन लाइन्स परिसरातील शतकभर जुने आणि प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई करत संस्थेचा परवाना निलंबित केला आहे. बुधवारी करण्यात आलेल्या तपासणीत स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. 1916 मध्ये स्थापन झालेले पारशी डेअरी फार्म हे मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित खाद्य आस्थापनांपैकी एक मानले जाते. मात्र, तपासणीत आढळलेल्या कथित स्वच्छतेच्या त्रुटींमुळे FDA ने ही कारवाई केली. यापूर्वीही FDA ने स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या कारणावरून मुंबईतील प्रसिद्ध के. रुस्तम आईस्क्रीम पार्लर, शालीमार रेस्टॉरंट आणि नूर मोहम्मदी रेस्टॉरंट यांच्या परवान्यांवरही निलंबनाची कारवाई केली होती. अलीकडच्या काळात मुंबईतील नामांकित आणि वारसा लाभलेल्या खाद्य आस्थापनांवर FDA कडून स्वच्छता नियमांच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने कारवाई केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *