Iran America War in strait of hormuz: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाची चिंता वाढवणाऱ्या इराण आणि अमेरिका यांच्यातील आखातातील युद्धाची झळ आता महाराष्ट्राला आणखी तीव्रपणे जाणवू लागली आहे. काही दिवसांपूर्वी या युद्धामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली. या आर्थिक फटक्यानंतर आता इराण-अमेरिका युद्धात (War) भारतीयांची जीवितहानी होऊ लागली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात करार झाल्याची चर्चा असतानाच काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला होता. अमेरिका आणि इराण (Iran) यांनी परस्परांच्याविरोधात जोरदार हल्ले सुरु केले होते. इराणकडून अमेरिकेचे मित्र असलेल्या आखातामधील देशांना लक्ष्य केले जात आहे. अशाच एका हल्ल्यात पुण्यातील एका अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Iran America War)
होमुर्झच्या सामुद्रधुनीत एका जहाजावर हल्ल्यात पुण्यातील हेरंब करमरकर (Heramb Karmarkar) या अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. हेरंब करमरकर हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते. एम व्ही जी एफ एस गॅलेक्सी या नौकेवर काम करत होते. ही नौका ओमानच्या सागरी हद्दीतून जात असताना रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास या नौकेवर हल्ला झाला. हवाई हल्ल्यामुळे जहाजाच्या इंजिन रुमजवळ आग लागली. त्यावेळी हेरंब करमरकर इंजिन रुमजवळ होते. या नौकेवरील 24 पैकी 23 जणांची त्यानंतर सुटका करण्यात आली. मात्र, हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. रविवारी हल्ला होण्यापूर्वी त्यांचे पुण्यातील कुटुंबाशी बोलणे झाले होते. रविवारी रात्री 2 वाजून 50 मिनिटांनी त्यांचं कुटुंबीयांसोबत शेवटचं बोलणं झालं होते. यानंतर मंगळवारी हेरंब यांच्या कंपनीकडून त्यांचे नातेवाईक रविंद्र टंडन यांना फोन करुन हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. ही बातमी ऐकून त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर पुण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आखाती देशांच्या परिसरात सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धाचा भडका उडाला आहे. अमेरिकेने इराणमधील अनेक प्रमुख ठिकाणांना ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्रांचा मारा करुन लक्ष्य करण्याचा सपाटा लावला आहे. इराणकडून अमेरिकेला थेट लक्ष्य करणे शक्य नसल्याने अमेरिकेचे तळ असलेल्या आणि मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशांना लक्ष्य केले जात आहे. याशिवाय, होमुर्झच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांनाही इराणकडून लक्ष्य केले जात आहे. हेरंब करमरकर यांच्या जहाजावर झालेला हल्ला हादेखील इराणकडून करण्यात आला असावा, अशी शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने एका जहाजावर केलेल्या हल्ल्यात काही भारतीयांचा मृत्यू झाला होता.
आणखी वाचा
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया