NCP Pune Mahangarpalika: मोठी बातमी: पुणे महानगरपालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार? उपमहापौरपदाची मागणी, संजय काकडे सुनेत्रा पवारांना भेटणार


पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. सत्तेत सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसला उपमहापौर पद देण्याची मागणी करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी म्हटलं आहे. सध्या पुणे मानपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पद आहे. राज्यात आम्ही सत्तेत आहोत तर मग पुणे महापालिकेत देखील सत्तेत येण्याची आवश्यकता आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि पक्षातील वरिष्ठ निर्णय घेतील पण यासंदर्भात मी सुनेत्रा पवार यांच्याशी बोलणार असल्याचंही काकडेंनी म्हटलं आहे.(Pune News)  पुणे महापालिकेत सत्तेत सहभागी होण्याची इच्छा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मागणी करणार असल्याचं काकडे म्हणालेत. पुणे महापालिकेत घटक पक्ष म्हणून उपमहापौर पद आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात यावे अशी माझी इच्छा आहे, मी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ही मागणी करणार, अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असंही त्यांनी म्हटलंय.

NCP Pune Mahangarpalika:  नेमकं काय म्हणालेत संजय काकडे?

आम्ही राज्याच्या सत्तेत घटकपक्ष आहोत. महापालिका निवडणुका झाल्यानंतर दादांची देखील इच्छा होती की, पाठिंबा देतोय तर काही पद आम्हाला मिळाली पाहिजेत. उपमहापौर पद आम्हाला मिळायला पाहिजे होतं, कारण आमची पण बऱ्यापैकी नगरसेवक संख्या आहे. २२ ते २३ नगरसेवक हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यामुळे उपमहापौरपदाची मागणी मी करणार आहे.  देवेंद्र फडणवीसांकडे देखील मी ही मागणी करणार आहे की, उपमहापौर पद आम्हाला द्या, जसं की, मुंबई महापालिका असेल, इतर महापालिकांमध्ये घटक पक्षाला म्हणजेच सपोर्ट करणाऱ्या पक्षाला काही ना काही पद दिली गेली आहे, तसंच पुणे महापालिकेमध्ये देखील उपमहापौर पद आमच्या पक्षासाठी मागणार आहे. ते काय निर्णय घेतात ते पाहू, आता आम्ही मागणी करणार आहे की, आम्हाला उपमहापौरपद द्या. ही माझी इच्छा आहे, आता पुण्याच्या पालकमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे. पुणे महापालिकेच्या सत्तेत वाटा हवा आहे, हा विषय आम्ही सुनेत्रा पवारांच्या कानावर घालणार आहे, जर आम्ही दिल्लीत, राज्यात सोबत सत्तेत आहे, तर मग इथे का विरोधात बसायचं त्यामुळे उपमहापौरपदासाठी मी सुचवणार आहे, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील तो मान्य आहे, असंही काकडेंनी पुढे म्हटलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *