Kolhapur Crime News : पतीला सरकार म्हणायचं, तर सासूला.. सासरच्यांकडून प्रचंड छळ, आई गेल्याने बारशाआधीच तान्हुली पोरकी – Marathi News | Kolhapur Crime : Mother of 1 Month Old Dies; In Laws Blamed for Harassment and Demands


कोल्हापुरात विवाहीत महिलेनं संपवलं आयुष्य

Kolhapur Crime News: अवघ्या महिन्याभरापूर्वी झालेली डिलीव्हरी, पदरातली पोर अवघी 1 महिन्याची.. तिच्याच बारशाची थाटामाटात तयारी सुरू, ऑनलाईन 50 हजारांचा मागवलेला पाणा, सगळीकडे लगबग असतानाच कोल्हापुरातील राजारामपुरीमध्ये अघटित घडलं. महिन्याभराच्या मुलीचं बारसं होण्याआधीच तिच्या आईन टोकाचं पाऊल उचललं आणि घरात एकच आक्रोश उमटला. कोल्हापुरातील अस्मिता प्रतीकसिंह काटकर या महिलेने गळफास लावू घेत तिचा जीव दिला, डायरेक्ट आत्महत्या केली. राजारामपुरीत घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ माजली असून, आपल्या तान्ह्या नातीला, आपलीच मुलगी सोडून गेली हे पाहून अस्मिताच्या आई-वडिलांनी काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला. मात्र आमच्या लेकीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असा आरोप आई-वडिलांनी केला असून, सासरच्या लोकांकडून अस्मिताचा छळ झाल्याचाही दावा त्यांनी केला. एका महिन्याच्या मुलगी क्षणात पोरकी झाली, तिच्या आईने उचलेल्या या पावलामुळे अख्ख कुटुंब आणि कोल्हापूर (Kolhapoor News) स्तब्ध झालं आहे.

सासरच्यांकडून प्रचंड छळ

मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2024 मध्ये अस्मिता आणि प्रतीकसिंह काटकर यांचं लग्न झालं. मात्र तिच्या माहेरच्यांनी सासरच्या लोकांवर अनेक आरोप केलेत. मुलीचा अतोनात छळ व्हायचा असंही त्यांचं म्हणणं आहे. लग्नात तिने डान्स करावा अशी सासरच्यांची इच्छा होती, खूप आग्रह करूनही तिने नाच करण्यास नकार दिला. त्यामुळे तिचे सासरक़चे लोक नाराज होते . त्यामुळे तिला छळलं जायचं. एवढंच नव्हे तर माहेरून पैसे आण, अशी वारंवार मागणीदेखील केली जायतची असा आरोप आहे.

मुलगा होणार म्हणून घेतले कपडे

अस्मिता गरोदर असल्याचे समजल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींना मुलगा होईल, अशी मोठी अपेक्षा होती. त्यांच्या मनात आधीपासूनच मुलाच्या जन्माची कल्पना होती आणि त्यांनी त्यासाठी तयारीही सुरू केली होती. घरात येणाऱ्या बाळासाठी त्यांनी खास मुलांचे कपडे, खेळणी आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करून ठेवल्या होत्या. मात्र, जेव्हा अस्मितेने एका गोंडस मुलीला जन्म दिला, तेव्हा त्यांच्या अपेक्षांना धक्का बसला. मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्याऐवजी काही नातेवाईकांनी आणि कुटुंबातील व्यक्तींनी अस्मिता व तिच्या कुटुंबावर टोमणे मारण्यास सुरुवात केली. यामुळेही अस्मिताचा छळ झाला,तिला खूप त्रास सहन करावा लागला.

पैशांची मागणी काही थांबेचना

अस्मिता हिच्या विवाहानंतर तिच्या माहेरच्या कुटुंबाने आपल्या परीने मुलीच्या संसारासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली होती. लग्नाच्या वेळी तिच्या वडिलांनी तब्बल 9 तोळे सोने दिले होते. तसेच नव्या संसारासाठी सुमारे 5 लाख रुपयांचा संसारसेट भेट म्हणून दिला होता. लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीत जावयाचा मान राखण्यासाठी त्यांनी 81 हजार रुपये ऑनलाइन पाठवले होते. त्यानंतर अधिक मासाच्या निमित्ताने हजारो रुपये रोख, तसेच चांदीची भांडी देण्यात आली. अस्मितेच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही माहेरच्या मंडळींनी मोठ्या थाटामाटात केला असून त्यासाठी सुमारे 2 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला, असं पालकाचं म्हणणं आहे.

प्रसूतीच्या वेळीही मुलीच्या आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेत अस्मिताच्या वडिलांनी दवाखान्याचा 77 हजार रुपयांचा खर्च स्वतः उचलला. यानंतर सासरच्या मंडळींच्या आग्रहामुळे बाळासाठी 52 हजार रुपयांचा पाळणाही खरेदी करण्यात आला. अशा प्रकारे लग्नापासून अवघ्या 18 महिन्यांच्या कालावधीत अस्मितेच्या माहेरच्या कुटुंबाने मुलीच्या संसारासाठी आणि सासरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जवळपास 25 लाख रुपयांहून अधिक खर्च केल्याचा दावा तिच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, एवढे सर्व करूनही सासरच्या मंडळींच्या अपेक्षा आणि मागण्या कमी झाल्या नाहीत, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तिच्यावर सातत्याने दबाव होता.

अस्मितावर होते अनेक बंधनं

साडीचा पदर डोक्यावरून कधीही ढळू द्यायचा नाही, घरातील मोठ्या व्यक्तींसमोर मान खाली घालूनच बोलायचे, बाहेरच्या माणसांसमोर कधीही बोलायचं नाही, स्वत:चं मत मांडायचे नाही— अशा असंख्य बंधनांमध्ये अस्मिताचे आयुष्य हळूहळू कैद होत गेले. तिला प्रत्येक क्षणी कसे वागायचे, कसे बोलायचे, कसे राहायचे याच्या सूचना दिल्या जात. एवढंच नव्हे तर घरात किंवा बाहेर असतानाही सासूला आदराने “माँसाहेब”, सासऱ्यांना “आबासाहेब”, नवऱ्याला “सरकार” आणि नणंदेला “राणीसाहेब” म्हणून हाक मारण्याची सक्ती होती.

दिवसेंदिवस वाढणारा मानसिक ताण, अपमानास्पद वागणूक आणि पैशांसाठीचा दबाव यामुळे अस्मिता आतून खचत गेली. मुलगी झाल्यावर तर तिच्यावर असलेला दबाव आणि टोमणे आणखीनच वाढले. त्यामुळेच, पदरात अवघी 1 महिन्याची मुलगी असतानाही, अस्मिताने टोकाचं पाऊल उचलून आपलं आयुष्य संपवलं, असा आरोप आहे.  मात्र तिच्या जाण्यामुळे अवघी महिन्याभराची तान्ही मुलगी तिच्या आईला मुकली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *