Shiv Puran: कलियुग…. हिंदू धर्मातील चार युगांपैकी चौथे आणि शेवटचे युग मानले जाते. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग अशी या युगांची क्रमवारी आहे. पुराणांनुसार श्रीकृष्णांनी पृथ्वीवरील अवतारकार्य पूर्ण केल्यानंतर कलियुगाची सुरुवात झाली, अशी धार्मिक मान्यता आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये कलियुगाचे वर्णन विविध पुराणांत आढळते. शिवपुराणातही कलियुगात धर्माचा ऱ्हास, नैतिक मूल्यांची घसरण आणि मानवी स्वभावातील बदल यांचा उल्लेख आहे. हे वर्णन धार्मिक श्रद्धा आणि पुराणपरंपरेचा भाग आहे. पुराणांनुसार, सध्या कलियुग सुरू आहे. अनेक ग्रंथांमध्ये या युगातील मानवी स्वभाव आणि सामाजिक परिस्थितीत होणाऱ्या बदलांचे वर्णन आहे. यांपैकी, शिवपुराणात कलियुगाच्या वैशिष्ट्यांची सविस्तर चर्चा केली आहे. आज आपण शिवपुराणानुसार जाणून घेणार आहोत, कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाणार?
कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाईल? शिवपुराणात म्हटलंय….(Shiv Puran)
शिवपुराणानुसार, कलियुगात जन्मलेल्या प्रत्येकाचा अंत अटळ असतो. त्यामुळे, कालचक्रातील युगांचे बदलणे हे देखील नैसर्गिक आहे. शिवपुराणातील विद्याश्वर संहितेच्या पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायात कलियुगाच्या स्वरूपाचे सविस्तर वर्णन आहे. महर्षी सूत आणि ऋषीमुनी यांच्यातील संवादात कलियुगाची सुरुवात, त्याची वैशिष्ट्ये आणि मानवी समाजात होणारे बदल यांचे वर्णन आहे. शिवपुराणानुसार, जसा कलियुगाचा प्रभाव वाढतो, तसा धर्माचा ऱ्हास होत जाईल. लोक सत्याचा त्याग करून खोटेपणा, कपट आणि लोभ यांसारख्या दुर्गुणांकडे वळतील. इतरांना दोष देणे, त्यांच्या संपत्तीचा लोभ धरणे आणि परस्त्रीलंपटपणा ही सामान्य वैशिष्ट्ये सांगण्यात आली आहेत.
सत्यापेक्षा स्वार्थाला प्राधान्य
शिवपुराणानुसार, कलियुगात लोक स्वतःच्या फायद्यासाठी असत्य बोलतील आणि स्वार्थासाठी नातेसंबंधही विसरतील.
लोभ आणि धनलालसा वाढेल
शिवपुराणानुसार, कलियुगात पैसा आणि संपत्तीला सर्वाधिक महत्त्व दिले जाईल. धर्म, सदाचार आणि प्रामाणिकपणा दुय्यम ठरू शकतो.
राग आणि अहंकार
शिवपुराणानुसार, कलियुगात छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद, मतभेद आणि संघर्ष वाढतील. संयम कमी होईल.
नात्यांमध्ये विश्वास कमी होईल
शिवपुराणानुसार, कलियुगात कुटुंबातील प्रेम, आदर आणि विश्वास कमी होऊन स्वार्थी वृत्ती वाढू शकते.
धर्माचे बाह्य प्रदर्शन वाढेल
शिवपुराणानुसार, कलियुगात श्रद्धेपेक्षा दिखावा आणि प्रतिष्ठेसाठी धार्मिक कर्मकांड करण्याची प्रवृत्ती वाढेल, असे वर्णन आढळते.
गुरू आणि ज्येष्ठांचा आदर कमी होईल
शिवपुराणानुसार, कलियुगात आई-वडील, गुरू आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान कमी होऊन त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष होईल.
असत्य आणि फसवणूक वाढेल
शिवपुराणानुसार, कलियुगात प्रामाणिकपणापेक्षा कपट, फसवणूक आणि खोटेपणाचा प्रभाव वाढेल, असे पुराणात सांगितले आहे.
मन अस्थिर राहील
शिवपुराणानुसार, कलियुगात चिंता, असंतोष, स्पर्धा आणि मानसिक अस्थिरता वाढेल. त्यामुळे मनःशांती मिळणे कठीण होईल.
कलियुगाच्या अंतासाठी किती वेळ शिल्लक आहे?
पुराणांनुसार, कलियुगाच्या सुरुवातीपासून केवळ सुमारे 5000 वर्षे उलटली आहेत. कलियुगाचा एकूण कालावधी 4,32,00 वर्षे असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे हिंदू धर्मग्रंथांनुसार, कलियुगाच्या अंतापर्यंत लाखो वर्षे शिल्लक आहेत.
कलियुगात मोक्षाचा मार्ग
अनेक हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की, कलियुगात कठोर तपश्चर्येपेक्षा ईश्वरनामस्मरण, भक्ती, सत्कर्म, दान, सत्याचे पालन आणि धर्माचरण यांना अधिक महत्त्व आहे. भगवान शिव, विष्णू, श्रीराम किंवा श्रीकृष्ण यांच्या नामजपाने आणि निस्वार्थ भक्तीने आध्यात्मिक प्रगती साधता येते, अशी धार्मिक मान्यता आहे.
हेही वाचा :
Ganesh Chaturthi 2026: बाप्पा येतायत…गणेशोत्सव ‘या’ तारखेपासून सुरू! 3 शुभ योगात साजरा होणार उत्सव, अनंत चतुर्दशी कधी? सर्व तारखा, शुभ मुहूर्त, महत्त्व….
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)