Pune Moshi Building Collapse: ‘यंदा कामाचा खूप व्याप आहे. वारी (Wari) यंदा राहू दे, पुढच्या वर्षी विठूरायाच्या चरणी नक्की जाईन,’ असा विचार मनाशी पक्का करून 34 वर्षीय सुनील कोरके (Sunil Korke) बुधवारी नेहमीप्रमाणे कामावर गेले. मात्र नियतीने त्यांच्या आयुष्यासाठी काही वेगळेच ठरवले होते. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत कॅन्टीनमध्ये बसून जेवायला सुरुवात करण्याआधीच मोशी (Moshi) येथील कचरा डेपो (Garbage Depot) परिसरातील इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळला आणि या भीषण दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका क्षणात कोरके कुटुंबाचा आनंदी संसार उद्ध्वस्त झाला.
मूळचे पंढरपूर (Pandharpur) येथील असलेले सुनील कोरके हे गेल्या दहा वर्षांपासून पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरातील एका खासगी कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होते. प्रामाणिक, मेहनती आणि कुटुंबवत्सल अशी त्यांची ओळख होती. दहा वर्षांपूर्वी मोठ्या उत्साहात त्यांचा विवाह झाला आणि संसाराला सुरुवात झाली.
Pune Moshi Building Collapse: 25 दिवसांपूर्वीच गोंडस मुलाचा जन्म
अवघ्या 25 दिवसांपूर्वी त्यांच्या घरी एका गोंडस मुलाचा जन्म झाला होता. घरात नव्या पाहुण्याच्या आगमनाने आनंदाचे वातावरण होते. आपल्या नवजात मुलाला कुशीत घेऊन त्याच्यासाठी अनेक स्वप्ने पाहणाऱ्या सुनील यांच्या आयुष्याला मात्र नियतीने अकाली पूर्णविराम दिला. पितृत्वाचा आनंद मनसोक्त अनुभवण्यापूर्वीच काळाने त्यांना आपल्या कवेत घेतले.
Pune Moshi Building Collapse: कामाच्या व्यापामुळे वारीला जाता आले नाही
सुनील यांचे वडील गावाकडे शेती करतात, तर त्यांचा भाऊ अनिल कोरके वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी सांभाळतो. नोकरीनिमित्त शहरात राहत असूनही सुनील यांचे मन कायम पंढरपूर आणि विठ्ठल भक्तीत रमलेले असायचे. दरवर्षी माऊली आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन विठ्ठल नामाचा गजर करणाऱ्या सुनील यांना यंदा कामाच्या व्यापामुळे वारीला जाता आले नव्हते. ‘यंदा नाही, पुढच्या वर्षी नक्की वारी करेन,’ हा त्यांचा निर्धार आयुष्यातील शेवटचा ठरला. एका बाजूला पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांचा जल्लोष सुरू असताना, दुसऱ्या बाजूला त्याच पंढरपूरच्या एका वारकऱ्याची जीवनवारी मोशी दुर्घटनेत कायमची थांबली.
Pune Moshi Building Collapse: कोरके कुटुंबावर दुःखाचा डोंगर
या घटनेनंतर कोरके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कर्त्या मुलाच्या निधनाने वृद्ध आई-वडील शोकसागरात बुडाले आहेत. तर अवघ्या 25 दिवसांच्या चिमुकल्याला छातीशी कवटाळून अश्रू ढाळणाऱ्या पत्नीचे दुःख पाहून परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करत आहेत. एका क्षणात आनंदी संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या दुर्घटनेने संपूर्ण राज्याला हळहळ व्यक्त करण्यास भाग पाडले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा