India lose No 1 T20I spot : इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, टीम इंडियाचा 4 वर्षांचा घमंड उतरला, ICC रँकिंगमध्येही उलटफेर, भारताला मोठा फटका


India lose No 1 T20I : इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाची अत्यंत निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडने भारताचा 4-0 असा धुव्वा उडवत मालिका खिशात घातली. पावसामुळे पहिला सामना रद्द झाल्यानंतर उर्वरित चारही सामने इंग्लंडने जिंकले. विशेष म्हणजे, इंग्लंडच्या भूमीवर द्विपक्षीय टी-20 मालिकेत भारताला पहिल्यांदाच क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारताला आणखी एक मोठा धक्का बसला. तब्बल चार वर्षांपासून टी-20 क्रमवारीत कायम असलेले भारताचे अव्वल स्थान आता इंग्लंडने हिसकावून घेतले आहे. या मालिकेतील दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने आयसीसी टी-20 संघ क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली.

258 धावांच्या लक्ष्यापुढे भारताचा पराभव

मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर 258 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 20 षटकांत 8 बाद 201 धावाच करता आल्या आणि भारताला 56 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची ही मालिका अत्यंत निराशाजनक ठरली. 258 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवातच खराब झाली. जोफ्रा आर्चरने तिसऱ्याच षटकात सलामीवीर अभिषेक शर्माला केवळ 3 धावांवर बाद केले. त्यानंतर संजू सॅमसन आणि ईशान किशन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. संजू सॅमसन चांगल्या लयीत दिसत होता. त्याने 14 चेंडूत 27 धावांची खेळी करताना 3 चौकार आणि 2 षटकार लगावले. मात्र मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आले. सॅम करनने त्याचा अडथळा दूर केला.

ईशान-श्रेयसची भागीदारी

संजू बाद झाल्यानंतर ईशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 55 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दोघेही आक्रमक फलंदाजी करत असताना लियाम डॉसनने अय्यरला बाद करत ही जोडी फोडली. अय्यरने 16 चेंडूत 4 चौकारांसह 28 धावा केल्या. त्यानंतर ईशान किशननेही दमदार अर्धशतक झळकावले. त्याने 35 चेंडूत 56 धावा करताना 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले. मात्र आदिल रशीदने त्याला बाद केले. शिवम दुबे 14 धावा करून परतला, तर तिलक वर्माने शेवटपर्यंत झुंज देत 25 चेंडूत 53 धावांची झंझावाती खेळी केली. त्याच्या खेळीत 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. मात्र त्याची खेळीही भारताला विजय मिळवून देऊ शकली नाही.

बटलर-ब्रूकची विक्रमी भागीदारी

यापूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकांत 3 बाद 257 धावांचा डोंगर उभारला. भारताविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा इंग्लंडचा सर्वोच्च धावसंख्या ठरली. जोस बटलर आणि कर्णधार हॅरी ब्रूक यांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 233 धावांची विक्रमी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. बटलरने 64 चेंडूत 131 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या खेळीत 12 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजूला हॅरी ब्रूक 45 चेंडूत 95 धावांवर नाबाद राहिला. त्याने 4 चौकार आणि 8 षटकारांची आतषबाजी केली.

इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच भारताचा क्लीन स्वीप

या मालिकेतील सर्वात मोठी नकारात्मक बाब म्हणजे इंग्लंडच्या भूमीवर भारताला टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत प्रथमच क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला असला, तरी उर्वरित चारही सामने इंग्लंडने जिंकत भारतीय संघाचा पूर्णपणे धुव्वा उडवला. या पराभवासह भारताचे टी-20 क्रमवारीतील अव्वल स्थानही गेले असून इंग्लंडने आता जगातील नंबर-1 टी-20 संघ बनण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची सुरुवात मोठ्या निराशेने झाली असून भारतीय संघाच्या कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत.

हे ही वाचा –

Vaibhav Sooryavanshi Crying : टीम इंडियाचा पराभव होताच वैभव सूर्यवंशी भर मैदानात एकटा बसून रडू लागला; इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यानंतर काय घडलं?, VIDEO



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *